पीटीआय, नवी दिल्ली : भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात ‘एलआयसी’ने अदानी समूहातील सात कंपन्यांमध्ये केलेली ३०,१२७ कोटी रुपयांची गुंतवणूक गेल्या आठवडय़ात तोटय़ाच्या उंबरठय़ावर येऊन ठेपली होती. मात्र गेल्या दोन सत्रात अदानी समूहातील कंपन्यांमध्ये आलेल्या तेजीमुळे ‘एलआयसी’च्या अदानी समभागांतील गुंतवणुकीचे मूल्य ९,००० कोटी रुपयांनी वधारून ३९,०६८.३४ कोटी रुपयांवर पोहोचले आहे.
भांडवली बाजाराकडून उपलब्ध आकडेवारीनुसार, ‘एलआयसी’च्या अदानी समभागातील गुंतवणुकीचे मूल्य २४ जानेवारीला सुमारे ८१,२३६ कोटी रुपये होते. मात्र, ‘हिंडेनबर्ग’ अहवालातील आरोपांनंतर अदानी समूहातील सर्वच कंपन्यांच्या समभागांची मोठी वाताहत झाली. ‘एलआयसी’च्या अदानी समभागांतील गुंतवणुकीचे मूल्य घसरून २४ फेब्रुवारी रोजी २९,८९३.१३ कोटी रुपयांवर घसरले होते.
‘एलआयसी’ने ३० जानेवारीपासून अदानी समूहातील कोणत्याच कंपन्यांमध्ये नवीन गुंतवणूक केलेली नाही किंवा समभाग विक्रीही केलेली नाही. ३० सप्टेंबर २०२२ पर्यंत ‘एलआयसी’च्या व्यवस्थापनाखालील एकूण मालमत्ता ४१.६६ लाख कोटींहून अधिक होती. ‘एलआयसी’चे अदानी समूहातील गुंतवणूक मूल्य एकूण व्यवस्थापनाखालील मालमत्तेच्या १ टक्क्यापेक्षा कमी आहे. ‘एलआयसी’ची सर्वाधिक गुंतवणूकवाढ ‘अदानी टोटल गॅस’मध्ये झाली आहे. ती २०२०च्या सप्टेंबरमध्ये १ टक्क्यापेक्षा कमी होती, मात्र सप्टेंबर २०२२ मध्ये ती ५.७७ टक्के झाली. अदानी पोर्ट्स, अदानी पॉवर, अदानी विल्मर या कंपन्यांतील तिच्या गुंतवणुकीत फारशी वाढ झालेली नाही.