LIC Offices To Remain Open On Weekend: नव्या आर्थिक वर्षाच्या पार्श्वभूमीवर एलआयसीने पॉलिसीधारकांना त्यांच्या पॉलिसीचे हप्ते भरता यावेत यासाठी महत्वाचा निर्णय घेतला आहे. ग्राहकांच्या सोयीसाठी शनिवार, रविवार आणि ईदची सुटी असलेल्या सोमवारीही एलआयसीच्या देशभरातील कार्यालयांचे कामकाज सुरू राहणार असल्याचे एलआयसीने स्पष्ट केले आहे.

आर्थिक वर्ष संपत असल्याने पॉलिसीधारकांना त्यांच्या पॉलिसीचे हप्ते भरता यावेत यासाठी झोन आणि विभागांच्या अखत्यारीतील एलआयसीची कार्यालये २९ मार्च, ३० मार्च आणि ३१ मार्च रोजी अधिकृत कामकाजाच्या वेळेनुसार खुली राहतील, असे विमा कंपनी एलआयसीने एका निवेदनात म्हटले आहे.

दरम्यान सुट्ट्यांच्या दिवशीही एलआयसीची कार्यालये सुरू ठेवण्याचा निर्णय भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने १२ मार्च २०२५ रोजी जारी केलेल्या सल्ल्यानुसार घेण्यात आल्याचे, एलआयसीच्या निवेदनात म्हटले आहे.

परवडणाऱ्या दरात विमा

एलआयसीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धार्थ मोहंती यांनी काही दिवसांपूर्वीच ग्रामीण भाग आणि समाजातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकांना परवडणाऱ्या दरात विमा प्रदान करण्यावर कंपनीने लक्ष केंद्रीत केले असल्याचे म्हटले होते.

अक्षय प्रीमियममध्ये २८.२९ टक्के वाढ

दरम्यान एलआयसीने आपले आर्थिक वर्ष २५ च्या पहिल्या ११ महिन्यांत वार्षिक अक्षय प्रीमियममध्ये २८.२९ टक्के आणि वैयक्तिक प्रीमियममध्ये ७.९ टक्के वाढ नोंदवली आहे. फेब्रुवारी २०२५ पर्यंत, एलआयसीचे एकूण प्रीमियम संकलन १.९० लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे, जे मागील वर्षाच्या तुलनेत १.९० टक्क्यांनी जास्त आहे. पण, फेब्रुवारी २०२५ मध्ये वैयक्तिक प्रीमियम १.०७ टक्क्यांनी कमी होऊन ४,८३७.८७ कोटी रुपये झाला आहे, जो फेब्रुवारी २०२४ मध्ये ४,८९०.४४ कोटी रुपये होता.

११ महिन्यांच्या कालावधीत ग्रुप प्रीमियम अंतर्गत विकल्या गेलेल्या पॉलिसींची संख्या ४,८९८ होती, जी मागील वर्षी विकल्या गेलेल्या ४,३१४ पॉलिसींपेक्षा १३.५३ टक्क्यांनी वाढली आहे.