लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी
मुंबई : देशातील सर्वात मोठी आयुर्विमा कंपनी असणाऱ्या भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात एलआयसीचा निव्वळ नफा डिसेंबरअखेर सरलेल्या तिसऱ्या तिमाहीत ४९ टक्क्यांनी ९,४४४ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. गेल्यावर्षी याच तिमाहीत कंपनीला ६,३३४ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता.
एलआयसीचे निव्वळ प्रीमियमपोटी उत्पन्न विद्यमान आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत १,११,७८८ कोटी रुपयांवरून वाढून १,१७,०१७ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. शिवाय एकूण उत्पन्न गेल्या वर्षीच्या डिसेंबरच्या तिमाहीत १,९६,८९१ कोटी रुपये होते. ते आता २,१२,४४७ कोटी रुपयांवर पोहोचले आहे. एलआयसीच्या संचालक मंडळाने प्रति समभाग ४ रुपयांचा अंतरिम लाभांश जाहीर केला आहे.
हेही वाचा >>>सहकारी गृह वित्त संस्थांची व्यवस्था विकसित करण्याची गरज; सतीश मराठे
बाजारमूल्यात पाचव्या स्थानावर झेप
एलआयसीच्या समभागाने गुरुवारच्या सत्रात ६ टक्क्यांची उसळी मारली. परिणामी तिचे बाजारमूल्य ६.९९ लाख कोटी रुपयांवर पोहोचले. भांडवली बाजारात एलआयसी खासगी क्षेत्रातील आयसीआयसीआय बँकेला मागे टाकत बाजार भांडवलाबाबत पाचवी सर्वात मौल्यवान कंपनी बनली आहे.
एलआयसीचे बाजारमूल्य ३८,७४०.६२ कोटी रुपयांनी वाढून ६,९९,७०२.८७ कोटी रुपयांवर पोहोचले. मुंबई शेअर बाजारात एलआयसीचा समभाग ५.८६ टक्क्यांनी वाढून १,१०६.२५ रुपयांवर स्थिरावला. दिवसभरात, त्याने ९.५१ टक्क्यांची झेप घेत १,१४४.४५ रुपयांचा विक्रमी उच्चांक गाठला.
१९.६४ लाख कोटी रुपयांच्या बाजार मूल्यांकनासह रिलायन्स इंडस्ट्रीज ही देशातील सर्वात मौल्यवान कंपनी आहे. एलआयसी मे २०२२ मध्ये भांडवली बाजारात सूचिबद्ध झाली. सरकारने ‘आयपीओ’च्या माध्यमातून एलआयसीतील ३.५ टक्के हिस्सा विकला होता. सध्या एलआयसीमध्ये केंद्र सरकारची ९६.५ टक्के मालकी आहे.