नवी दिल्ली : भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात एलआयसीने सरकारी कंपनी असलेल्या राष्ट्रीय खनिज विकास महामंडळामधील (एनएमडीसी) हिस्सेदारी कमी केली आहे. डिसेंबर ते मार्च या कालावधीत २ टक्के हिस्सेदारी विकून एलआयसीने ७०० कोटी रुपये मिळविले आहेत. एलआयसीने बाजारमंचाला दिलेल्या माहितीनुसार, एनएमडीसीमधील तिची हिस्सेदारी २९ डिसेंबर २०२२ ते १४ मार्च २०२३ या कालावधीत १३.६९ टक्क्यांवरून ११.६९ टक्क्यांवर आली आहे.
एलआयसीने सरासरी प्रति समभाग ११९.३७ रुपयांप्रमाणे एनएमडीसीच्या समभागांची विक्री केली. कंपनीतील सुमारे २ टक्के हिस्सा म्हणजेच ५.८८ कोटी समभागांची खुल्या बाजारात विक्री केली गेली. आता एलआयसीकडे खनिज क्षेत्रातील सरकारी कंपनी असलेल्या एनएमडीसीचे ३४.२६ कोटी समभाग आहेत. मुंबई शेअर बाजारात बुधवारी, एनएमडीसीचा समभाग ०.३० टक्क्यांच्या वाढीसह ११६.७५ रुपयांवर व्यवहार करत बंद झाला.