नवी दिल्ली : देशातील सरकारी मालकीची सर्वात मोठी आयुर्विमा कंपनी असलेल्या भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात ‘एलआयसी’च्या व्यवस्थापनाखालील मालमत्तेने (एयूएम) ५० लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. ‘एलआयसी’च्या व्यवस्थापनाखालील मालमत्ता ही शेजारील देशांच्या अर्थव्यवस्थेच्या आकारमानालाही वरचढ ठरली आहे.
हेही वाचा >>> “निवडणुकीत भाजपाचा पराभव झाला तर…”, भारताच्या अर्थव्यवस्थेबाबत माजी RBI गव्हर्नर रघुराम राजन यांचं मोठं वक्तव्य
एलआयसीच्या मालमत्तेत (एयूएम) वर्षभरात १६.४८ टक्क्यांची भरीव वाढ झाली असून ते आता ५१,२१,८८७ (६१६ अब्ज डॉलर) कोटी रुपये झाले आहे. शेजारील राष्ट्र असलेल्या पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश यांच्या सकल राष्ट्रीय उत्पादनापेक्षा (जीडीपी) ती अधिक आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या आकडेवारीनुसार, बांगलादेशचा जीडीपी ४५५ अब्ज डॉलर आहे. तर ‘एलआयसी’ची एकूण मालमत्ता ६१६ अब्ज डॉलर आहे. याचबरोबर पाकिस्तान (३३८.२४ अब्ज डॉलर), श्रीलंका (४४.१८ अब्ज डॉलर), नेपाळ (७४.८५ अब्ज डॉलर) या देशांच्या एकत्रित जीडीपीहूनदेखील ‘एलआयसी’ची मालमत्ता अधिक भरणारी आहे.
हेही वाचा >>> भाजपाला बहुमत न मिळाल्यास शेअर मार्केटमध्ये काय होईल? वाचा कंपन्यांच्या उच्चपदस्थांचं भाकित!
बाजारमूल्यात सहाव्या स्थानी ‘एलआयसी’चा समभाग भांडवली बाजारात सूचिबद्ध असून तिचे बाजारमूल्य ६.३० लाख कोटी रुपयांवर पोहोचले. भांडवली बाजारात ‘एलआयसी’ सहावी सर्वात मौल्यवान कंपनी आहे. १९.४९ लाख कोटी रुपयांच्या बाजारमूल्यांकनासह रिलायन्स इंडस्ट्रीज ही देशातील सर्वात मौल्यवान कंपनी आहे. ‘एलआयसी’चे समभाग मे २०२२ मध्ये भांडवली बाजारात सूचिबद्ध झाले. सरकारने ‘आयपीओ’च्या माध्यमातून ‘एलआयसी’तील ३.५ टक्के हिस्सा त्यावेळी विकला होता. सध्या ‘एलआयसी’मध्ये केंद्र सरकारची ९६.५ टक्के मालकी आहे. ती आणखी कमी करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.