LIC Policy Jeevan Utsav : देशातील सर्वात मोठी विमा कंपनी भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) ने त्यांची नवीन योजना, एलआयसी जीवन उत्सव (LIC Jeevan Utsav Plan) बाबत माहिती दिली आहे. या योजनेअंतर्गत एलआयसीने हमी परतावा आणि खात्रीशीर उत्पन्नाचे आश्वासन दिली आहे. एलआयसीने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत सांगितलं की, जीवन उत्सव योजना ही ‘नॉन-लिंक्ड’, नॉन-पार्टिसिपेटिंग, वैयक्तिक बचत, संपूर्ण जीवन विमा योजना आहे. एलआयसीचा जीवन उत्सव प्लॅन क्रमांक ८७१ आहे, जो आजीवन गॅरंटीड परताव्यासह येतो.
या योजनेमध्ये तुम्हाला फुल लाइफ इन्शुरन्स आणि बेनिफिट पेमेंटचा पर्याय मिळणार आहे. या योजनेचा मर्यादित प्रीमियम पेमेंट कालावधी ५ ते १६ वर्षे असणार आहे. तसेच प्रीमियम भरताना हमी परतावा वाढण्याची तरतूद आहे. या योजनेत तुम्हाला नियमित उत्पन्नाचा लाभ आणि फ्लेक्सी उत्पन्नाचा लाभ मिळणार आहे.
या योजनेची किमान विमा रक्कम ५ लाख रुपये असणार आहे. तर पॉलिसी सुरू करताना पॉलिसीधारकाचे किमान वय १८ आणि प्रीमियम पूर्ण होण्याच्या वेळीचे वय कमाल ७५ वर्षे असावे. या योजनेअंतर्गत, एलआयसी पॉलिसीधारकाला ५.५ टक्के दराने वार्षिक व्याज देखील देणार आहे. परंतु, पॉलिसीधारकाला या योजनेअंतर्गत मॅच्युरिटीचा लाभ मिळणार नाही.
जीवन उत्सव योजनेचे इतर फायदे –
एलआयसीचे अध्यक्ष सिद्धार्थ मोहंती यांनी या योजनेबद्दल माहिती देताना सांगितलं की, एलआयसी जीवन उत्सव योजना निश्चित परतावा देईल आणि ती पूर्ण झाल्यानंतर, पॉलिसीधारकाला आजीवन विम्याच्या रकमेच्या १० टक्के मिळतील. मोहंती पुढे म्हणाले, प्रत्येकाला जाणून घ्यायचे आहे की, ते किती गुंतवणूक करणार आहेत आणि २० ते २५ वर्षांनी त्यांना किती पैसे मिळणार आहेत. याशिवाय एलआयसी जीवन उत्सव योजनेच्या वैशिष्ट्यांमध्ये कर्ज सुविधा आणि मुदतपूर्व पैसे काढणे यांचाही समावेश करण्यात आला असल्याचंही त्यांनी सांगितलं.