LinkedIn Founder Podcast: गेल्या काही वर्षांपासून कॉर्पोरेट क्षेत्रातील वर्क लाइफ बॅलन्स आणि वर्क फ्रॉम होमची सतत चर्चा सुरू आहे. फक्त चर्चाच नाही, तर या मुद्द्यांवरून अनेक वादही झाल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. अशात आता लिंक्डइनचे सह संस्थापक रीड हॉफमन यांचा २०१४ मधील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्यांनी वर्क लाइफ बॅलन्स आणि व्यावसायिक यश यावर भाष्य केले आहे. दरम्यान हॉफमन यांच्या या व्हिडिओवर हजारो प्रतिक्रिया आणि लाइक्स येत आहेत.

आयुष्यात वर्क लाइफ बॅलन्स…

दरम्यान रीड हॉफमन यांनी २०१४ मध्ये स्टॅनफोर्ड विद्यापीठात ‘हाऊ टू स्टार्ट अ स्टार्टअप’ यावर मार्गदर्शन करताना म्हटले होते की, “जर मी कधी एखाद्या कंपनीच्या संस्थापकाला, त्यांच्या आयुष्यात वर्क लाइफ बॅलन्स आहे असे म्हणताता ऐकले, तर ते जिंकण्यासाठी वचनबद्ध नाहीत असे समजेन.” हॉफमन यांनी पुढे सांगितले की, “खरे महान संस्थापक फक्त तेच असतात जे म्हणतात की, मी कामासाठी अक्षरशः सर्वकाही पणाला लावायला तयार आहे.’”

कोरोनापासून कामाच्या ठिकाणी आरोग्याविषयीची चर्चा वाढत आहे. तरीही हॉफमन यांची भूमिका अजूनही बदललेली नाही. “वर्क लाइफ बॅलन्स हा स्टार्ट-अप गेम नाही,” असे त्यांनी नुकत्याच प्रदर्शीत झालेल्या डायरी ऑफ अ सीईओ पॉडकास्टवर म्हटले.

कर्मचाऱ्यांना सुट्टीचा पर्याय नव्हता

यावेळी रीड हॉफमन यांनी त्यांनी लिंक्डइन कंपनी स्थापन केल्यांतरचा सुरुवातीचा अनुभवही सांगितला. लिंक्डइन कंपनीच्या सुरुवातीच्या काळात एक तृतीयांश कर्मचाऱ्यांना मुले होती, तरीही त्यांना घरी जेवणाचा अपवाद वगळता सुट्टीचा पर्याय नव्हता, असे त्यांनी सांगितले.

रीड हॉफमन म्हणाले, “जेव्हा आम्ही लिंक्डइन सुरू केले, तेव्हा आमच्या कंपनीतील बहुतांश कर्मचाऱ्यांची लग्ने झाली होती, त्यांना मुले होती. म्हणून आम्ही त्यांना म्हणायचो, घरी जा आणि तुमच्या कुटुंबासह जेवण करा. मग, तुमच्या जेवणानंतर, तुमचा लॅपटॉप उघडा आणि पुन्हा कामाला सुरुवात करा.”

त्या १०० कर्माचाऱ्यांना कामची गरज नाही

दरम्यान रीड हॉफमन यांनी यावेळी कामाच्या ठिकाणी लिक्डइनच्या कर्मचाऱ्यांनी कष्ट केल्याने त्याचे त्यांना उत्तम बक्षीसही मिळाल्याचे सांगितले. ते म्हणाले, “कंपनीच्या यशामुळे लिंक्डइनच्या सुरुवातीच्या सुमारे १०० कर्मचाऱ्यांना आता काम करण्याची गरज नाही”.