लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी
मुंबई: तिशी-पस्तिशीतच स्वमालकीचे घर, चारचाकी बाळगण्याचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या आजच्या तरुणाईने वयाची साठी म्हणजे निवृत्ती ही रूळलेली संकल्पनाही मोडीत काढली आहे. लवकर निवृत्त व्हायच्या या विचाराला अनुरूप योग्य त्या आर्थिक उपायांचीही जोड मिळायला हवी. अशा निवांत निवृत्त जीवनासाठी करावयाच्या नियोजनाची मांडणी हाच गुरुवारी सायंकाळी होत असलेल्या ‘लोकसत्ता अर्थभान’च्या विशेष सत्राचा विषय आहे.
आयुष्याच्या जीवनचक्रातील निवृत्ती हा सर्वात नाजूक टप्पा असतो आणि तो निर्धोक, निवांत आणि सुरक्षित राहावा, यासाठी खूप आधीपासून कमावत्या वयातच तयारी करावी लागते. या अंगाने तरुण पगारदारांसाठी ‘लोकसत्ता अर्थभान’च्या सत्रातून तज्ज्ञांचे दिशादर्शन नक्कीच उद्बोधक ठरेल. मुख्य प्रायोजक ‘क्वांटम म्युच्युअल फंडा’च्या सहयोगाने होत असलेला हा कार्यक्रम गुरुवारी, १२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता, लोकमान्य सेवा संघ, पु. ल. देशपांडे सभागृह, तिसरा मजला, राम मंदिर रोड, विलेपार्ले (पूर्व) येथे होत आहे.
हेही वाचा… नाडेला, पिचई यांना मागे टाकत श्रीमंत व्यवस्थापकांमध्ये जयश्री उल्लाल अव्वल स्थानी
हेही वाचा… ‘टीसीएस’ची १७ हजार कोटींची ‘बायबॅक’ योजना; प्रत्येकी ४,१५० रुपये किमतीला समभाग खरेदी
उच्चशिक्षण, पर्यायाने नोकरीच्या चांगल्या संधी, भरगच्च पगार यामुळे वयाच्या अगदी बावीस-पंचविसाव्या वर्षीच तरुणांहाती चांगलाच पैसा खेळू लागला आहे. उत्साहाने भारलेल्या, नव्या उमेदीने जगू पाहणाऱ्या आजच्या तरुणाईला आशा-आकांक्षाचे नवीन आकाशही खुणावत आहे. मात्र आयुष्यासाठी ठरविलेल्या आर्थिक लक्ष्यांना गाठू शकणाऱ्या बचत आणि गुंतवणुकीच्या मार्गाचा पडताळाही त्यांनी करणे तितकेच आवश्यक आहे. या संबंधानेच आर्थिक नियोजनकार कौस्तुभ जोशी आणि शेअर गुंतवणुकीचे अभ्यासक व स्तंभलेखक अजय वाळिंबे हे या कार्यक्रमातून मांडणी करतील. उपस्थित गुंतवणूक-उत्सुकांना या तज्ज्ञांना या निमित्ताने थेट प्रश्नही विचारता येतील.
सहभाग :
० कौस्तुभ जोशी (आर्थिक नियोजन तज्ज्ञ)
० अजय वाळिंबे (शेअर गुंतवणूक अभ्यासक)
कधी : गुरुवार, १२ ऑक्टोबर २०२३, सायंकाळी ५.३० वाजता
कुठे : लोकमान्य सेवा संघ, पु. ल. देशपांडे सभागृह, टिळक मंदिर रोड, विले पार्ले (पूर्व)
म्युच्युअल फंडातील गुंतवणूक बाजारातील जोखमीच्या अधीन असतात, योजनेसंबंधी सर्व दस्तऐवज काळजीपूर्वक वाचावेत.