मुंबई : आपल्या गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळावा, अशी सर्वाचीच अपेक्षा असते. तरी भांडवली बाजारात सेन्सेक्स-निफ्टी निर्देशांकांची उच्चांकी दौड पाहता, सध्याचा काळ पैसा गुंतवण्यासाठी योग्य आहे का आणि नसेल तर पैसा कुठे गुंतवावा, असा स्वाभाविकच अनेकांपुढे प्रश्न आहे. मात्र सतावत असलेली महागाई, चढे व्याजदर अशा स्थितीत पैशाने पैसा वाढवत नेण्याचे अर्थात गुंतवणुकीचे मर्मही प्रत्येकाने जाणून घेतलेच पाहिजे. याचेच मार्गदर्शन ‘लोकसत्ता अर्थसल्ला’ गुंतवणूकविषयक जागरातून शनिवारी केले जाईल.
मुंबई विद्यापीठातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी हे विशेष ‘लोकसत्ता अर्थसल्ला’ मार्गदर्शनसत्र शनिवारी, २९ जूनला दुपारी ३.१५ वाजता आयोजित करण्यात आले आहे. आघाडीचे म्युच्युअल फंड घराणे असलेल्या आयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंड प्रस्तुत हा कार्यक्रम मुंबई विद्यापीठ, फोर्ट येथील सर कावसजी जहांगीर दीक्षांत सभागृहात संपन्न होत आहे. हा कार्यक्रम केवळ मुंबई विद्यापीठात कार्यरत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी मर्यादित आहे. वित्तीय नियोजनकार आणि स्तंभलेखक कौस्तुभ जोशी याप्रसंगी मार्गदर्शक वक्ते म्हणून उपस्थित असतील. त्यांना गुंतवणूकविषयक शंका आणि प्रश्न थेट विचारण्याची संधी या निमित्ताने उपस्थितांना मिळेल.
हेही वाचा >>> वित्तीय तूट ३ टक्क्यांवर; महालेखापालांची माहिती, चालू आर्थिक वर्षातील मेअखेरची स्थिती
चढती महागाई, व्याजदरातील वाढ यातून महिन्याकाठी हाती पडणारे वेतन थोडके ठरावे अशी स्थिती आहे. या अंगाने नियमित बचत आणि गुंतवणूक महत्त्वाचीच ठरते. महागाईला मात देणारा परतावा आणि कर बचत अशा दोन्ही दृष्टीने म्युच्युअल फंडातील गुंतवणूक महत्त्वपूर्ण ठरली आहे. या आणि अन्य गुंतवणुकीच्या वाटा कोणत्या या संबंधाने कौस्तुभ जोशी हे या कार्यक्रमात मार्गदर्शन करतील. विशेषत: मुलांचे उच्च-शिक्षण, त्यांचे लग्न, मोठे घर आणि गाडी ते निवृत्तीपश्चात निर्धास्त जीवनमान असे संपूर्ण आयुष्याचे आर्थिक नियोजन हे गुंतवणुकीच्या माध्यमातून साधण्याचे कानमंत्रही ते या निमित्ताने देतील.
मनात बाळगलेली स्वप्न आणि आर्थिक उमेद पूर्ण होण्याच्या दृष्टीने हे गुंतवणूकपर मार्गदर्शन नवीन आस जागविणारे निश्चितच असेल.
कधी : शनिवार, २९ जून २०२४,
केव्हा : दुपारी ३.१५ वाजता
कुठे : सर कावसजी जहांगीर दीक्षांत सभागृह, मुंबई विद्यापीठ, फोर्ट
वक्ते : कौस्तुभ जोशी, गुंतवणूक नियोजनकार, अर्थ अभ्यासक
प्रवेश केवळ मुंबई विद्यापीठातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी मर्यादित
म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन असते, योजनेसंबंधी सर्व दस्तऐवज काळजीपूर्वक वाचावेत.