मुंबई : नवीन वर्ष हे नवीन अपेक्षा घेऊन येणाऱ्या नव्याची सुरुवात असते. त्यामुळे २०२३ सालातील गुंतवणुकीची आपली पहिली काही पावले ठरवलेल्या आर्थिक उद्दिष्टाच्या पूर्ततेपर्यंत घेऊन जाणारी ठरायची तर ती जपून आणि विचारपूर्वकच टाकली जायला हवीत. या अंगाने नव्याने सुरू झालेल्या ‘लोकसत्ता अर्थभान’ मालिकेतंर्गत डोंबिवलीकरांसाठी उपकारक ठरणारे विशेष सत्र येत्या शनिवारी योजण्यात आले आहे.
आदित्य बिर्ला सन लाइफ म्युच्युअल फंड प्रस्तुत ‘लोकसत्ता अर्थभान’ या गुंतवणूकदार जागराच्या मालिकेतील पुढील सत्रात ‘गुंतवणुकीतून श्रीमंतीकडे’ यासंबंधाने मार्गदर्शन तज्ज्ञांकडून केले जाणार आहे. हा कार्यक्रम शनिवार, ७ जानेवारी २०२३ रोजी सायंकाळी ६.३० वाजता पार पडणार आहे. ब्राह्मण सभा, पहिला मजला, टिळक रोड, कृष्ण राधा सोसायटी, डोंबिवली (पूर्व) हे या कार्यक्रमाचे ठिकाण आहे.
पैशाची बचत करणे हे आजच्या काळात सर्वथा महत्त्वाचेच आणि हा बचत केलेला पैसा योग्य त्या ठिकाणी गुंतविला जाणे हे त्याहून अधिक महत्त्वाचे आहे. अर्थात ही गुंतवणूक ठरविलेली स्वप्ने आणि उद्दिष्ट पूर्ण करतील असा परतावा देणारी, सुरक्षित आणि करबचत करणारीही असायला हवी. अशा सर्वांगीण आर्थिक नियोजनासंबंधी या कार्यक्रमात सनदी लेखापाल आणि ‘सेबी’संलग्न वित्तीय नियोजनकार तृप्ती राणे या मार्गदर्शन करतील. ‘अर्थनियोजनातून स्वप्नपूर्ती’ या विषयाद्वारे जीवनाच्या विविध टप्प्यांत अनुसरायचे गुंतवणुकीचे मार्ग त्या सांगतील.
मोठ्या कालावधीसाठी गुंतवणुकीत सातत्य राखल्यास इच्छित संपत्ती निर्मितीसाठी शेअर बाजार, म्युच्युअल फंड हे सर्वोत्तम मार्ग असल्याचे सिद्ध झाले आहे. तथापि सेन्सेक्स-निफ्टी निर्देशांकांनी उच्चांकी शिखर गाठले आहे अशा बाजारात शेअरची निवड कशी करावी, या तंत्राबद्दल अनुभवी शेअर अभ्यासक आणि स्तंभलेखक अजय वाळिंबे यांना यानिमित्ताने उपस्थितांना ऐकता येणार आहे. दोन्ही वक्त्यांना प्रश्न विचारून उपस्थितांना त्यांच्या प्रश्न, समस्यांचे निवारणही यानिमित्ताने करता येईल.
लाभाचे आमिष जितके मोठे तितकी फसगत होण्याची जोखीमही अधिक वाढते. त्यामुळे या आमिषांना बळी न पडता, चांगला परतावा देणारे गुंतवणुकीचे अनेकानेक सुरक्षित आणि संतुलित पर्यायांबद्दल जाणीव जागृती आणि दीर्घ मुदतीत संपत्तिनिर्माणाचा अर्थात गुंतवणुकीच्या सुयोग्य मार्गासंबंधी होणाऱ्या हितगुजात सर्वांचा सहभाग अगत्याचाच!
गुंतवणुकीतून श्रीमंतीकडे…
कधी : शनिवार, ७ जानेवारी २०२३
केव्हा : सायंकाळी ६.३० वाजता
कुठे : ब्राह्मण सभा, पहिला मजला, टिळक रोड, कृष्ण राधा सोसायटी, डोंबिवली (पूर्व)
वक्ते (विषय) : १. अजय वाळिंबे (चांगला शेअर कसा निवडायचा?)
२. तृप्ती राणे (गुंतवणुकीद्वारे अर्थ-नियोजन)
प्रवेश विनामूल्य, प्रथम येणाऱ्यास, प्रथम प्राधान्य. म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन असते, योजनेसंबंधी सर्व दस्तऐवज काळजीपूर्वक वाचावेत.