नवी दिल्ली : देशातील सर्वाधिक खपाच्या मोटारींच्या निर्मात्या मारुती सुझुकीने आगामी काळातही कमी किमतीच्या छोट्या आकाराच्या मोटारींना प्राधान्य देण्याची भूमिका कायम ठेवली आहे. सध्या मागणी कमी झाल्याने हे धोरण फसल्याचे दिसत असले तरी त्यावर भर देणाऱ्या भूमिकेत बदल होणार नाही, असे कंपनीचे अध्यक्ष आर. सी. भार्गव यांनी मंगळवारी स्पष्ट केले.
हेही वाचा >>> Keven Parekh : Apple च्या CFO पदी नियुक्ती झालेले केवन पारेख कोण आहेत? भारतीय वंशाच्या माणसावर मोठी जबाबदारी
मारुती सुझुकीच्या ४३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना भार्गव म्हणाले, कमी किमतीच्या आणि छोट्या मोटारी देशाची आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीचा विचार करता आवश्यक आहेत. सध्या या मोटारींनी मागणी कमी असली तरी भविष्यात आमचे याबाबतचे धोरण बदलणार नाही. ग्रामीण अर्थव्यवस्थेला उभारी मिळेल, याची आम्हाला खात्री आहे. अनेक स्कूटर चालविणारे छोट्या मोटारीकडे वळत आहेत. कंपनीने आर्थिक वर्ष २०२३-२४ साठी प्रति समभाग १२५ रुपये लाभांश जाहीर केला आहे. कंपनीच्या इतिहासातील हे सर्वांत चांगले वर्ष ठरले आहे. विद्युतशक्तीवरील ई-वाहनांबद्दल बोलताना भार्गव म्हणाले की, मारुतीची पहिली ई-मोटार पुढील काही महिन्यांत तयार होईल. तिची जागतिक बाजारपेठेतही निर्यात होणार आहे. कंपनीचे २०३० पर्यंत एकूण ४० लाख मोटारींच्या उत्पादनापैकी निर्यातीचे प्रमाण २० टक्क्यांवर नेण्याचे उद्दिष्ट आहे.