Commercial LPG Cylinder Price Today: महिन्याच्या खर्चाचे नियोजन करण्यासाठी पगाराची १ तारीख अत्यंत महत्त्वाची असते. या १ तारखेलाच दर महिन्यात काही गोष्टी स्वस्त होतात तर काही गोष्टी महाग होतात. यंदा मे महिन्याची १ तारीख आनंददायी व पैसे वाचवणारी ठरणार आहे. प्राप्त माहितीनुसार, महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती कमी करण्यात आल्या आहेत. लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचा तिसरा टप्पा जवळ असताना सिलिंडरच्या किमतीतील हा बदल सामान्यांना व व्यायसायिकांना सुखावणारा ठरू शकतो.
सरकारी तेल विपणन कंपन्यांनी बुधवारी व्यावसायिक वापराच्या एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती १९ रुपयांनी तत्काळ प्रभावाने कमी केल्या आहेत. एएनआयने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किरकोळ विक्री किंमत आता दिल्लीत १७४५.५० रुपये असणार आहे. गेल्या महिन्यात १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरची किंमत १७६४.५० रुपये असताना ३०.५० रुपयांची घट करण्यात आली होती.
किंमती कमी होण्यामागील नेमकी कारणे स्पष्ट नसली तरी, आंतरराष्ट्रीय तेलाच्या किमतीतील बदल, कर धोरणातील बदल आणि मागणी-पुरवठ्याची टक्केवारी हे मुद्दे किमतीत मोठे योगदान देतात. व्यावसायिक आणि घरगुती दोन्ही एलपीजी (लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस) सिलिंडरच्या किमतीत दर महिन्याच्या पहिल्या तारखेला बदल होत असतात.
तर घरगुती १४.५ किलोच्या गॅस सिलिंडरचे दर ८०३ रुपये आहेत. यंदा जानेवारीनंतर व्यावसायिक एलपीजीच्या किमतीत एप्रिलमध्ये पहिल्यांदा कपात झाली होती. तत्पूर्वी १ फेब्रुवारीला प्रति सिलेंडरचे दर १४ रुपये आणि १ मार्चला २५.५ रुपये वाढले होते.दरम्यान, पेट्रोल आणि डिझेलच्या किमती अजूनही स्थिर आहेत. मार्चच्या मध्यात पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर २ रुपयांनी कपात करण्यात आली होती.