तेल विपणन कंपन्यांनी १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत ७ रुपयांची वाढ केली आहे. ANIने दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीत त्याची किरकोळ किंमत १७७३ रुपयांवरून १७८० रुपयांपर्यंत वाढली आहे. त्याचबरोबर घरगुती एलपीजीच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. विशेष म्हणजे सलग तीन वेळा किमतीत कपात केल्यानंतर व्यावसायिक एलपीजीच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे. एप्रिल, मे आणि जूनमध्ये त्याच्या किमती कमी झाल्या. मार्चमध्ये व्यावसायिक एलपीजीच्या किमतीत मोठी वाढ झाली.
यंदा किंमत किती वेळा बदलली?
१ जून २०२३ रोजी तेल विपणन कंपन्यांनी LPG च्या किमतीत ८३ रुपयांनी कपात केली होती. यानंतर दिल्लीत त्याची किंमत १७७३ रुपयांवर गेली होती. मे महिन्यात व्यावसायिक एलपीजीच्या किमतीत १७१.५० रुपयांची कपात करण्यात आली होती. यानंतर दिल्लीत १९ किलोचा सिलिंडर १८५६.५० रुपयांचा झाला आहे. एप्रिलमध्येही एलपीजीच्या किमतीत ९२ रुपयांनी कपात करण्यात आली होती. तसेच मार्चमध्ये व्यावसायिक एलपीजीच्या किमतीत सुमारे ३५० रुपयांनी वाढ करण्यात आली.
घरगुती एलपीजीमध्ये कोणताही बदल नाही
घरगुती वापरासाठीच्या १४.२ किलो सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. त्याच्या किमतीतील शेवटचा बदल १ मार्च २०२३ रोजी झाला होता. त्यानंतर तो ५० रुपयांनी स्वस्त करण्यात आला. दिल्लीत घरगुती एलपीजीची किंमत ११०३ रुपये आहे. तसेच कोलकातामध्ये ११२९ रुपये, चेन्नईमध्ये १११८.५० रुपये आणि मुंबईमध्ये १११२.५० रुपये प्रति सिलिंडर उपलब्ध आहे.
हेही वाचाः देशात बेरोजगारीत मोठ्या प्रमाणात वाढ; ग्रामीण भागाला सर्वाधिक फटका
टोमॅटोदेखील महागला
व्यावसायिक एलपीजीच्या किमतीत वाढ अशा वेळी झाली आहे, जेव्हा टोमॅटोने लोकांच्या स्वयंपाकघराचे बजेट आधीच बिघडवले आहे. टोमॅटोचा भाव १०० रुपये किलोवर पोहोचला आहे. अनेक ठिकाणी तो १०० रुपयांच्या वर गेल्याचे वृत्त आहे. त्यामुळेच महागाईच्या या दुहेरी फटक्याची सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार आहे.
हेही वाचाः देशातल्या २ हजारांच्या ७६ टक्के नोटा बँकांमध्ये जमा; ३० सप्टेंबरपर्यंत बदलण्याची संधी