L&T Menstrual Leave: देशातील आघाडीची अभियांत्रिकी कंपनी लार्सन अँड टुब्रोचे अध्यक्ष एस. एन सुब्रमण्यम काही महिन्यांपूर्वी कर्मचाऱ्यांच्या कामाच्या तासांबाबत केलेल्या विधानामुळे चर्चेत आले होते. त्याच सुब्रमण्यम यांनी आता त्यांची कंपनी मासिक पाळीच्या काळात महिला कर्मचाऱ्यांना एक दिवसाची पगारी रजा देणार असल्याची घोषणा केली आहे.
लार्सन अँड टुब्रोच्या निर्णयामुळे कंपनीच्या सुमारे ५००० महिला कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे. या निर्णयामुळे मासिक पाळीदरम्यान महिला कर्मचाऱ्यांना पगारी रजा देणारी लार्सन अँड टुब्रो त्यांच्या क्षेत्रातील पहिलीच कंपनी ठरली आहे. दरम्यान यापूर्वी स्वीगी आणि झोमॅटोसारख्या कंपन्यांनीही मासिक पाळीदरम्यान महिला कर्मचाऱ्यांना सुट्टी देण्याचा निर्णय घेतला आहे.
मूळ कंपनीच्या कर्मचाऱ्यांनाच लाभ
सुब्रमण्यम यांनी केलेली ही घोषणा फक्त मूळ कंपनी एल अँड टीच्या महिला कर्मचाऱ्यांनाच लागू होणार आहे. त्यांच्या वित्तीय सेवा किंवा तंत्रज्ञानात क्षेत्रातील उपकंपन्यांच्या महिला कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार नाही. एल अँड टीच्या ६०,००० कर्मचाऱ्यांपैकी सुमारे ९ टक्के, म्हणजेच सुमारे ५,००० महिला आहेत.
२०२४ मध्ये ओडिशा सरकारने राज्यातील सरकारी आणि खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना मासिक पाळी दरम्यान एक दिवसाची सुट्टी देण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी असा निर्णय घेणारे ओडिशा हे देशातील पहिले राज्य ठरले होते.
काय म्हणाले होते एल अँड टी चे अध्यक्ष?
काही महिन्यांपूर्वी एल अँड टीचे अध्यक्ष सुब्रमण्यम यांनी कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी आठवड्यातून ९० तास काम करावे असा सल्ला दिला होता. याचबरोबर रविवारी पत्नीकडे पाहत बसण्यापेक्षा काम करावे असेही ते म्हणाल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले होते. या विधानानंतर त्यांच्यावर देशभरातील सर्वच क्षेत्रातील लोकांकडून टीका झाली होती.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये लार्सन अँड टुब्रोचे अध्यक्ष एस. एन सुब्रह्मण्यम यांना कर्मचाऱ्यांशी संवाद साधताना विचारण्यात आले की, अब्जावधी डॉलर्सची उलाढाल असलेली लार्सन अँड टुब्रो कंपनी अजूनही कर्मचाऱ्यांना शनिवारी का काम करायला लावत आहे.
पत्नीकडे किती वेळ पाहणार?
याला उत्तर देताना ते म्हणाले होते की, “रविवारी मी तुम्हाला (कर्मचाऱ्यांना) काम करायला लावत नाही याचा मला पश्चात्ताप वाटतो. जर मी तुम्हाला रविवारीही काम करायला सांगितले तर मला जास्त आनंद होईल, कारण मीसुद्धा रविवारी काम करतो.” ते पुढे म्हणाले होते की, “घरी बसून तुम्ही काय करता? तुम्ही तुमच्या पत्नीकडे किती वेळ पाहणार? पत्नी तुमच्याकडे किती वेळ पाहणार? त्यापेक्षा कार्यालयात या आणि कामाला लागा.”