लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी
मुंबई : सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ महाराष्ट्रमधील (महाबँक) ‘एआयबीईए’ या संघटनेने गुरुवारी देशव्यापी संपाची हाक दिली आहे. बँकेतील सर्व श्रेणीतील कर्मचाऱ्यांची नोकरभरती, कर्मचाऱ्यांशी निगडित सर्व प्रश्नांवर द्विपक्षीय वाटाघाटीतून तोडगा, कायद्यातील तरतुदीचे, उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करावे या मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला आहे.
कर्मचाऱ्यांशी निगडित विविध प्रश्नांवर तिसऱ्या फेरीत मुंबईच्या कामगार आयुक्तांशी चर्चेची आणखी एक फेरी झाली. मात्र व्यवस्थापन आठमुठी भूमिका घेत असल्यामुळे कुठलाही तोडगा निघाला नाही आणि त्यामुळेच महाबँकेतील कर्मचारी संपावर जाण्यावर ठाम आहेत. संघटनेच्या वतीने देशभरातून निदर्शने, मोर्चे, मेळावे धरणे, मोर्चे अशा निषेधात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवारच्या संपानंतर, २१ मार्च रोजी एक दिवस बँकेचे व्यवहार सुरू असतील. मात्र पुन्हा २२ आणि २३ मार्च रोजी साप्ताहिक सुटीनंतर २४, २५ मार्चला नऊ राष्ट्रीय संघटनांनी एकत्र येऊन बनविलेल्या ‘युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन’च्या संपाच्या आवाहनानुसार, इतर बँकांसह महाबँकेचे कामकाज त्या दोन दिवशी बाधित होईल. यातून ग्राहकांची मोठी गैरसोय टाळण्यासाठी होण्याची शक्यता आहे.