पुणे : बँक ऑफ महाराष्ट्रने (महाबँक) मार्चअखेर संपलेल्या तिमाहीत १ हजार ४९३ कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावणारी कामगिरी शुक्रवारी जाहीर केली. गेल्या वर्षीच्या तुलनेत बँकेचा तिमाही नफा २३ टक्के वाढला आहे.महाबँकेचे व्यवस्थापकीय संचालक निधू सक्सेना यांनी शुक्रवारी तिमाही निकालांची घोषणा केली. त्यानुसार बँकेला, मार्चअखेर संपलेल्या तिमाहीत ७,७११ कोटी रुपयांचे एकूण उत्पन्न मिळाले आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत ते ६,४८८ कोटी रुपये होते. बँकेचे निव्वळ व्याज उत्पन्न गेल्या वर्षीच्या तुलनेत २०.५९ टक्क्यांनी वाढून ३,११६ कोटी रुपयांवर गेले आहे. बँकेचा निव्वळ व्याज नफा ४.०१ टक्क्यांवर पोहोचला आहे.
बँकेच्या अनुत्पादित कर्जात घट झाली असून, त्यांचे प्रमाण एकूण कर्जांच्या १.७४ टक्क्यांवर आले आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत हे प्रमाण १.८८ टक्के होते. याचवेळी बँकेच्या बुडीत कर्जांचे प्रमाण ०.१८ टक्क्यावर आले आहे. बँकेच्या एकूण व्यवसायात १५.३० टक्के वाढ होऊन तो ५.४७ लाख कोटी रुपयांवर पोहोचला आहे. बँकेच्या ठेवींमध्ये १३.४४ टक्के वाढ होऊन त्या ३.०७ लाख कोटी रुपये झाल्या आहेत. आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये बँकेच्या निव्वळ नफ्यात ३६.१२ टक्क्यांची वाढ होऊन, तो ५,५२० कोटी रुपये झाला आहे. आधीच्या आर्थिक वर्षात बँकेचा निव्वळ नफा ४,०५५ कोटी रुपये होता.
महाबँकेच्या संचालक मंडळाने कर्ज आणि रोख्यांच्या माध्यमातून ७,५०० कोटी रुपयांची भांडवल उभारणी करण्यास मंजुरी दिली आहे. बँकेत सरकारचा ७९.६० टक्के हिस्सा असून, तो कमी होण्यास यामुळे मदत होणार आहे, असे महाबँकेचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्याधिकारी, निधू सक्सेना यांनी स्पष्ट केले.