मुंबईः विकसित होऊ घातलेले भारत-पश्चिम आशिया-युरोप आर्थिक क्षेत्र अर्थात ‘आयमेक’साठी देशातील संपन्न राज्य असलेले महाराष्ट्र हेच प्रवेशद्वार ठरेल, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. व्यापारी मार्ग पुनरूज्जिवीत करण्यासह, राजकीय व सांस्कृतिक संबंधांना वृद्धींगत करण्यासाठी स्थापित बहुराष्ट्रीय मंचाच्या अनुषंगाने येथे आयोजित पहिल्या ‘आयमेक परिषदे’त ते बोलत होते.
मुंबई आणि महाराष्ट्राची ‘आयमेक’च्या घडणीत महत्त्वाची भूमिका राहिल आणि हा प्रकल्प यशस्वी होण्यासाठी आवश्यक ती सुविधा देणारी परिसंस्था राज्याकडून निर्माण केली जाईल, अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली. त्यांनी राज्यातील बुलेट ट्रेन प्रकल्प आणि वाढवण बंदर यासह महत्त्वाकांक्षी पायाभूत प्रकल्पावर सुरू असलेल्या कामांचीही माहिती दिली.
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या बाबतीत गुजरातमधील कामाची वेगाने प्रगती सुरू आहे, तर महाराष्ट्रानेही कामाचा वेग वाढवला आहे. हे पाहता देशातील हा पहिला बुलेट ट्रेन प्रकल्प २०२८ पर्यंत कार्यान्वित होईल. बरोबरीने देशातील सर्वात मोठे कंटेनर बंदर वाढवण देखील पुढील ३ ते ४ वर्षात कार्यान्वित होईल. बुलेट ट्रेनच्या मार्गावरील या ठिकाणी स्थानक असेल आणि बंदरापासून २० मिनिटांत मुंबईत वांद्रे-कुर्ला संकुलात पोहोचता येईल, असे ते म्हणाले. बंदराची क्षमता वाढवण्यासाठी वाढवण येथे एक नवीन विमानतळ देखील कार्यान्वित होत आहे असेही त्यांनी सांगितले.
विश्वामित्र रिसर्च फाऊंडेशनद्वारे आयोजित या परिषदेत बोलताना, सल्लागार कंपनी पीडब्ल्यूसीचे भारतातील अध्यक्ष संजीव कृष्णन म्हणाले की, प्रस्तावित आयमेक कॉरिडॉर हे विद्यमान व्यापार मार्गांसह एकत्रित केल्यास, जागतिक अर्थव्यवस्थेवर बहुआयामी परिणाम करणारे ठरेल.
वैभवशाली ‘गोल्डन रोड’चा पुनर्जन्म – पुरी
केवळ ३.५ वर्षांत, भारताचा पेट्रोलियम व तेलाचा वापर प्रतिदिन ५० लाख पिंपांवरून ५५ लाख पिंपावर गेला असून, हळूहळू तो ६०-६५ लाख पिंप आणि २०५० पर्यंत दुप्पट होऊन १३२ लाख पिंपावर जाण्याची अपेक्षा आहे. भारताची ऊर्जा रणनीती त्याच्या आर्थिक महत्त्वाकांक्षा आणि जागतिक नेतृत्वातील नजीकच्या स्थानाचे प्रतिबिंब आहे. भारताने बहुतांश खनिज तेल आयात करूनही, जगभरात भागीदारी मजबूत करत ऊर्जा स्रोतांमध्ये वैविध्यही आणले आहे. देशांतर्गत ऊर्जा उत्पादनांत वाढीसह, इथेनॉल मिश्रणाला प्रोत्साहन दिले जात आहे आणि हरित हायड्रोजन उपक्रमांमध्येही भारत नेतृत्व करत आहे. याच संदर्भात ‘आयमेक’ हे भारताच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे. हा एक केवळ एक व्यापारी वाहतूक मार्ग नाही, तर तो प्राचीन जगाच्या वैभवशाली ‘गोल्डन रोड’चा (सुवर्ण मार्ग) पुनर्जन्म आहे, असे प्रतिपादन केंद्रीय तेल व नैसर्गिक वायूमंत्री हरदीप सिंग पुरी यांनी परिषदेला शुभेच्छा देताना व्यक्त केले.