मुंबईः केंद्रीय अर्थमंत्रालयाने आखलेल्या ‘एक राज्य, एक ग्रामीण बँक’ धोरणानुसार, प्रादेशिक ग्रामीण बँकांच्या चौथ्या टप्प्यांतील विलीनीकरणातून देशातील ग्रामीण बँकांची संख्या ४३ वरून २८ एवढी होणार आहे. महाराष्ट्रात सध्या कार्यरत दोन बँकांमधून, ‘विदर्भ कोकण ग्रामीण बँक’ ही ‘महाराष्ट्र ग्रामीण बँके’तील विलीनीकरण हे येत्या १ मे २०२४ अर्थात महाराष्ट्रदिनापासून अंमलात येणार आहे.

विदर्भ कोकण ग्रामीण बँकेचे १७ जिल्ह्यातील सेवा क्षेत्र, शाखा, कार्यालये, मालमत्ता, कर्ज व खातेदार यांचा राज्यात व्यवसायाच्या दृष्टीने मोठ्या असलेल्या महाराष्ट्र ग्रामीण बँकेत समावेश होणार आहे. यामुळे मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र व पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये कार्यरत असणार्‍या महाराष्ट्र ग्रामीण बँकेचा संपूर्ण राज्यभर विस्तार होणार आहे, तर एकूण व्यवसाय ४२,७७५ कोटी रुपये होईल, असे या बँकेचे अध्यक्ष मिलिंद घारड यांनी स्पष्ट केले.

एकत्रीकृत महाराष्ट्र ग्रामीण बँकेची पूर्वीप्रमाणेच ‘बँक ऑफ महाराष्ट्र’ हीच प्रायोजक बँक राहणार असल्याचे वित्तीय सेवा विभागामार्फत स्पष्ट करण्यात आले आहे. दोन्ही बँकांच्या सध्या असलेल्या अनुक्रमे ४२७ आणि ३२१ शाखा मिळून राज्यभरात महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या ७४८ शाखा व १३ विभागीय कार्यालये कार्यान्वित होणार आहेत. तिचे मुख्यालय छत्रपती संभाजीनगर हे राहणार असून एकत्रीकरणानंतर महाराष्ट्र ग्रामीण बँकेची अधिकारी – कर्मचारी संख्या जवळपास ३,००० होणार आहे.