मुंबई: राष्ट्रीय शेअर बाजाराने (एनएसई) प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, सरलेल्या २०२४-२५ आर्थिक वर्षात या शेअर बाजारावर कंपन्यांनी समभाग सूचिबद्ध करून उभारलेल्या भांडवलाच्या बाबतीत महाराष्ट्र देशातील अव्वल राज्य ठरले आहे. देशात सर्वाधिक विदेशी गुंतवणूक आकर्षित करणारे राज्याकडे हे देशांतर्गत गुंतवणूकदारांकडून सर्वाधिक निधी प्रवाह येत असल्याचे यातून अधोरेखित होते. 

शेअर बाजाराच्या मुख्य मंचावरील निधी उभारणीची क्रिया ही मुख्यत्वे देशातील काही प्रमुख आर्थिक क्षेत्रांपुरतीच अद्याप मर्यादित आहे. यात महाराष्ट्र, तामिळनाडू आणि कर्नाटक या राज्यांतील कंपन्यांनी एकत्रितपणे १ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी उभारला, ज्याचा सार्वजनिक समभाग विक्रीद्वारे (आयपीओ) उभारल्या गेलेल्या एकूण निधीत ६९ टक्के वाटा आहे. तर एकट्या महाराष्ट्राचा वाटा तब्बल ३२ टक्के राहिला आहे. इतकेच नाही तर सूक्ष्म-लघू-मध्यम उद्योग अर्थात एसएमई-केंद्रित ‘एनएसई इमर्ज’ या बाजारमंचावर महाराष्ट्रातील कंपन्यांचा एकूण निधी उभारणीच्या तुलनेत २७ टक्के वाटा २०२४-२५ मध्ये राहिला.

महाराष्ट्रासह, गुजरात आणि दिल्लीच्या राष्ट्रीय राजधानी क्षेत्र या तीन प्रदेशांतील कंपन्यांनी ‘एनएसई इमर्ज’वरून निधीचा एकूण उभारल्या गेलेल्या भांडवलाक एकत्रित ६२.१ टक्के वाटा होता. याचा अर्थ मोठ्या कंपन्यांसह आणि छोट्या कंपन्यांनाही वित्तीय स्रोत मिळवून देण्यात महाराष्ट्राची मजबूत कामगिरी राहिली आहे. शहरानिहाय तुलना करायची झाल्यास, बंगळुरूने निधी उभारणीत अव्वल स्थान राखले आहे. तेथील १० कंपन्यांनी मुख्य बाजारमंचावर एकत्रितपणे २८,०६२ कोटी रुपये असा सर्वाधिक निधी उभारला.

यापैकी बहुतेक कंपन्या या तंत्रज्ञान आणि ग्राहक क्षेत्रांतील आहेत. दरम्यान, तामिळनाडूतील कांचीपुरमने एकमेव ऐतिहासिक ‘आयपीओ’द्वारे २०२४-२५ सूचीत दुसरे स्थान राखले. भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा ‘आयपीओ’ ठरलेल्या – ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेडने या माध्यमातून २७,८५९ कोटी रुपये उभारले आहे.  ह्युंदाई मोटर चे नोंदणीकृत कार्यालय आणि उत्पादन सुविधा कांचीपूरममध्ये आहे.  नवी दिल्लीनेही जोरदार कामगिरी केली आणि तेथील १२ कंपन्यांनी २३,६१५ कोटी रुपये उभारले आहेत.