बंगळुरू : आरबीएल बँकेतील ३.५ टक्के हिस्सा महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीने आठवडाभरापूर्वी खरेदी केला असून, यापुढे बँकेतील हिस्सा आणखी वाढविणार नसल्याचे कंपनीने शुक्रवारी स्पष्ट केले.
महिंद्रने खासगी क्षेत्रातील बँक असलेल्या ‘आरबीएल’मधील हिस्सा ४१७ कोटी रुपयांना विकत घेण्याची घोषणा केली होती. कंपनीच्या या निर्णयाबद्दल गुंतवणूकदारांनी नापसंती दर्शविली आणि त्या परिणामी समभागात ६ टक्क्यांची घसरणही दिसून आली. त्या समयी भविष्यात ‘आरबीएल’मध्ये ९.९ टक्क्यांपर्यंत हिस्सा वाढविण्याचे नियोजन असल्याचेही कंपनीने जाहीर केले होते.
मात्र शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत महिंद्रचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिश शहा भूमिका स्पष्ट करताना म्हणाले की, आम्ही बँकिंग व्यवसाय जाणून घेण्याच्या उद्देशाने पुढील सात ते दहा वर्षांचा विचार करून ही गुंतवणूक केली आहे. भविष्यात त्यातून काही अर्थपूर्ण गोष्टी समोर आल्या नाहीत तर आमची गुंतवणूक ३.५ टक्क्यांवरच सीमित राहील. आज तरी ही गुंतवणूक वाढविण्याचा विचार नाही. या खासगी बँकेच्या संचालक मंडळात जागा मिळवण्याचा आमचा हेतू नाही, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.
भारतीय बँकिंग नियमन कायद्यानुसार बड्या उद्योग समूहांना बँकिंग क्षेत्रात मोठी गुंतवणूक करता येत नाही. एखाद्या बँकेतील १० टक्क्यांपेक्षा अधिक हिस्सा खरेदी करावयाचा असेल तर गुंतवणूकदाराला रिझर्व्ह बँकेची परवानगी आवश्यक असते.