पुणे : महिंद्र ॲण्ड महिंद्रने चाकणमध्ये अत्याधुनिक विद्युत वाहन (ईव्ही) निर्मिती प्रकल्प बुधवारी सुरू केला. या प्रकल्पाच्या माध्यमातून कंपनीची ईव्ही क्षेत्रातील गुंतवणूक ४,५०० कोटी रुपयांवर पोहोचली आहे.
चाकणमधील उत्पादन प्रकल्प ८८ हजार चौरस मीटरवर विस्तारलेला आहे. या प्रकल्पात कृत्रिम प्रज्ञेसह (एआय) इतर अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. कंपनीने प्रकल्पात १ हजार यंत्रमानवांचा (रोबो) वापर केला असून, विविध स्वयंचलित यंत्रणा या ठिकाणी अंतर्भूत केल्या आहेत. महिंद्रच्या इलेक्ट्रिक ओरिजीन एसयूव्हींचे उत्पादन येथे होणार आहे.
हेही वाचा >>>आयटीसीच्या शेअरच्या भावात घसरणीचे कारण काय? विलग झालेल्या हॉटेल व्यवसायाचे मूल्य अपेक्षेपेक्षा सरस
कंपनीने ईव्ही क्षेत्रात आर्थिक वर्ष २०२१-२२ ते २०२६-२७ या कालावधीत १६ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचे महत्त्वाकांक्षी नियोजन जाहीर केले आहे. त्यातील ४,५०० कोटी रुपयांचा निधी कंपनीने आतापर्यंत गुंतविला आहे.
महिंद्रच्या या प्रकल्पात बॅटरी जुळणीचे कामही होत आहे. जागतिक दर्जाची बॅटरी निर्मिती प्रक्रिया कंपनीने यासाठी विकसित केली आहे. कंपनीने संशोधन करून बॅटरीची कार्यक्षमता आणि सुरक्षितता वाढविली आहे. यासाठी कंपनीकडून बौद्धिक संपदा हक्कांसाठी अर्जही केले गेले आहेत.