PNB Sugam Fixed Deposit Scheme : देशातील दुसऱ्या क्रमांकाची सार्वजनिक क्षेत्रातील बँक असलेल्या पंजाब नॅशनल बँकेने (PNB) आता ‘सुगम फिक्स्ड डिपॉझिट स्कीम’मध्ये गुंतवणुकीची मर्यादा निश्चित केली आहे. आता ग्राहकांना या योजनेत पाहिजे तेवढे पैसे गुंतवता येणार नाहीत. PNB च्या नवीन नियमानुसार, आता तुम्ही या योजनेत जास्तीत जास्त १० लाख रुपयांची गुंतवणूक करू शकता.
विद्यमान गुंतवणूकदारांचे काय होणार?
पीएनबीच्या या नवीन नियमानंतर बँकेतील या योजनेतील विद्यमान गुंतवणूकदारांमध्ये गोंधळ निर्माण झाला होता, परंतु बँकेने त्यावर स्पष्टीकरण दिले. ज्या विद्यमान खातेदारांनी त्यांच्या एफडीच्या मॅच्युरिटीसाठी ऑटो नूतनीकरणाचा पर्याय निवडला आहे, त्यांची एफडी निश्चित केली जाणार आहे. तसेच त्या कालावधीसाठी नूतनीकरण केले जाणार असून, यावर पूर्वनिर्धारित व्याजदर लागू असणार आहे.
ही योजना एवढी लोकप्रिय का ?
या योजनेने PNB ग्राहकांमध्ये स्वतःसाठी एक स्थान निर्माण केले आहे. या योजनेत आधी १० कोटी रुपयांची मर्यादा होती, ती आता १० लाख रुपये करण्यात आली आहे. ही योजना बँकेच्या ग्राहकांमध्ये लोकप्रिय आहे, कारण या योजनेत गुंतवणूकदारांना मुदतपूर्तीपूर्वी पैसे काढण्यासाठी कोणताही दंड भरावा लागत नाही. बँकेने या योजनेत किमान मर्यादा १०,००० रुपये ठेवली आहे.
हेही वाचाः स्पाइसजेट पुन्हा बंद असलेली विमाने उडवण्याच्या तयारीत; एनसीएलटी नोटिशीला दिले हे उत्तर
१० वर्षांचा परिपक्वता कालावधी
सुगम एफडी योजनेचा परिपक्वता कालावधी ४६ दिवसांपासून ते १२० महिन्यांपर्यंत असतो. या योजनेत एखाद्या व्यक्तीला हवे असल्यास तो त्याच्या नावावर वैयक्तिक खाते उघडू शकतो किंवा संयुक्त खातेदेखील उघडू शकतो. या योजनेत १० वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या मुलासोबतही खाते उघडता येते.
हेही वाचाः सरकारकडून GST संदर्भात महत्त्वाचे अपडेट जारी; १ ऑगस्टपासून ‘या’ लोकांना इन्व्हॉइस भरावे लागणार
खाते कोण उघडू शकते?
पीएनबीच्या अधिकृत वेबसाइटनुसार, या योजनेत कोणीही सहज खाते उघडू शकतो. प्रोप्रायटरशिप/पार्टनरशिप फर्म, व्यावसायिक संस्था, कंपनी/कॉर्पोरेट संस्था, हिंदू अविभक्त कुटुंब, संघटना, क्लब, सोसायटी, ट्रस्ट किंवा धार्मिक/धर्मादाय किंवा शैक्षणिक संस्था, नगरपालिका किंवा पंचायत, सरकारी किंवा निमशासकीय संस्था आणि अगदी निरक्षर किंवा दृष्टिहीन व्यक्ती या योजनेंतर्गत खातेदेखील उघडू शकतात.