मुंबई : अदानी समूहातील समभागांमध्ये झालेल्या पडझडीने प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी गुरुवारच्या सत्रात घसरणीसह स्थिरावले. गौतम अदानी यांच्यावर लाचखोरीच्या अमेरिकेच्या आरोपानंतर अदानी समूहातील ११ सूचिबद्ध कंपन्यांच्या समभागांमध्ये गुरुवारच्या सत्रात मध्ये २३ टक्क्यापर्यंत घसरण झाली. भरीला, परदेशी निधीचे अविरत निर्गमन, आशियाई आणि युरोपीय बाजारातील कमकुवत कल देशांतर्गत निर्देशांकांना मंदीत लोटणारा ठरला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ४२२.५९ अंशांनी घसरून ७७,१५५.७९ पातळीवर स्थिरावला. सत्रादरम्यान त्याने ७७५.६५ अंश गमावत ७६,८०२.७३ या नीचांक पातळीला स्पर्श केला होता. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीने देखील १६८.६० अंश गमावत २३,३४९.९० अंशाची पातळी गाठली.

हेही वाचा…Gautam Adani Fraud: अदाणी समूहानं जारी केलं अमेरिकेतील आरोपांवर निवेदन; भ्रष्टाचार प्रकरणाबाबत मांडली भूमिका!

रशिया-युक्रेन संघर्षात वाढता तणाव आणि आण्विक युद्धाची चिंता जगाला सतावू लागल्याने देशांतर्गत बाजाराला नव्याने दबावाचा सामना करावा लागला आहे. शिवाय, अमेरिकेतील अदानी प्रकरणाने बाजाराच्या अडचणीत अतिरिक्त भर घातली. जागतिक आणि देशांतर्गत आघाडीवर राजकीय समस्या स्थिरस्थावर होतील, तेव्हाच बाजारात सुधारणा होणे अपेक्षित आहे, असे मत जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी व्यक्त केले.

सेन्सेक्समध्ये स्टेट बँक, एनटीपीसी, आयटीसी, एशियन पेंट्स, बजाज फायनान्स आणि बजाज फिनसर्व्ह या कंपन्यांच्या समभागात घसरण झाली. तर या पडझडीतही पॉवर ग्रिड, अल्ट्राटेक सिमेंट, एचसीएल टेक्नॉलॉजीज आणि ॲक्सिस बँकेच्या समभागांची कामगिरी चमकदार राहिली. मुंबई शेअर बाजाराच्या आकडेवारीनुसार, परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी (एफआयआय) मंगळवारच्या सत्रात ३,४११.७३ कोटी रुपये मूल्याच्या समभागांची विक्री केली.

हेही वाचा…Gold Silver Price Today : ऐन निवडणुकीत सोन्याच्या दरात पुन्हा तेजी! नेमकं किती रुपयांनी महागलं; वाचा तुमच्या शहरातील दर

एक डॉलर आता ८४.५० रुपयांना

मुंबई: स्थानिक भांडवली बाजारातील परदेशी गुंतवणूक वेगाने माघारी घेतली जात असल्याचा रुपयाच्या विनिमय मूल्याला फटका बसत असून, गुरुवारी अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाने आणखी सात पैशांच्या घसरणीसह ८४.५० या अभूतपूर्व नीचांकांवर लोळण घेतली.

एकीकडे परकीय गुंतवणूकदार बाजारात गुंतलेला पैसा वेगाने काढून घेत तो डॉलररूपाने माघारी नेत आहेत, तर दुसरीकडे रशिया-युक्रेन युद्ध आणखी भडकण्याच्या शक्यतेने खनिज तेलाच्या किमती भडकण्याची शक्यता आहे. परिणामी तेल आयातदारांकडूनही डॉलरची मागणी वाढल्याने रुपयाच्या मूल्यावर ताण वाढतो आहे, असे चलन बाजारातील व्यापाऱ्यांनी सांगितले.

आंतरबँक परकीय चलन व्यवहारात, अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपया ८४.४१ या पातळीवर खुला झाला. सत्रादरम्यान, स्थानिक चलनाचे मूल्य ८४.४१ च्या उच्च आणि ८४.५१ च्या निम्न स्तरादरम्यान फिरत राहिले. अखेरीस सात पैशांच्या तोट्यासह ते ८४.५० या सार्वकालिक नीचांकावर स्थिरावले.

सेन्सेक्स ७७,१५५.७९ – ४२२.५९ -०.५४%

निफ्टी २३,३४९.९० -१६८.६० -०.७२%

डॉलर ८४.५० ७ पैसे

तेल ७३.७१ १.१३

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Major indices sensex and nifty settled lower in thursdays session on fall in adani group shares print eco news sud 02