नवी दिल्ली, पीटीआय
अर्थव्यवस्थेचा गाभा व्यापणाऱ्या आठ प्रमुख क्षेत्रांनी जुलै महिन्यात ८ टक्के वाढ साधल्याचे गुरुवारी केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीने स्पष्ट केले. मुख्यतः कोळशाच्या उत्पादनात वाढ झाल्यामुळे आठ प्रमुख पायाभूत सुविधा क्षेत्रांची वाढ जुलैमध्ये ८ टक्क्यांवर पोहोचली आहे.
प्रमुख क्षेत्रांचा विकासदर जून महिन्यात ८.३ टक्के नोंदवला गेला होता, तर गेल्या वर्षी याच महिन्यात (जुलै २०२२) तो ४.८ टक्के नोंदवण्यात आला होता. प्रमुख आठ पायाभूत क्षेत्रांपैकी तीन क्षेत्रांनी सरलेल्या जुलै महिन्यात मोठी वाढ दर्शविली. या तीन क्षेत्रांमध्ये कोळसा, नैसर्गिक वायू आणि पोलाद यांचा समावेश आहे.
आणखी वाचा-आतापर्यंत २ हजार रुपयांच्या ९३ टक्के नोटा बँकांकडे परत, तुम्हीसुद्धा जमा केल्या आहेत ना?
कोळशाचे उत्पादन जुलैमध्ये वार्षिक १४.९ टक्क्यांनी वधारले. ते त्या आधीच्या म्हणजेच जूनमध्ये ९.८ टक्क्यांनी वधारले होते. तर नैसर्गिक वायूचे उत्पादन जूनमधील उणे ८.९ टक्क्यांच्या तुलनेत दुप्पट दराने वाढून ३.५ टक्क्यांवर पोहोचले आहे. कोळशाप्रमाणेच, पोलाद उत्पादनातील वाढ दुहेरी अंकात राहिली होती, ती १३.५ टक्के होती. मात्र, जूनमधील २०.८ टक्क्यांच्या तुलनेत त्यात घसरण झाली. आठ प्रमुख उद्योगांच्या एकत्रित निर्देशांकात या तीन क्षेत्रांचा वाटा ३५ टक्क्यांहून अधिक आहे. इतर पाच क्षेत्रांमुळे एकूण प्रमुख क्षेत्रांचा निर्देशांक खाली खेचला आहे. यात खनिज तेल आणि वीज उत्पादनात किंचित सुधारणा दिसून आली.
चालू आर्थिक वर्षांच्या एप्रिल-जुलै दरम्यान प्रमुख पायाभूत क्षेत्राचे उत्पादन ६.४ टक्क्यांनी घसरले आहे. वर्षभरापूर्वी म्हणजेच २०२२-२३ च्या पहिल्या चार महिन्यांत ते ११.५ टक्क्यांवर होते.