– पीटीआय, नवी दिल्ली
सोने आणि पारंपारिक बँक ठेवींबद्दल भारतीयांची आत्मीयता अबाधित आहे, इतकेच नव्हे तर वर्ष २०२३ मध्ये ७७ टक्के लोकांनी बचतीसाठी बँकेतील ठेवींना प्राधान्य दिले. तर २१ टक्के लोकांचा सोन्यातील गुंतवणुकीकडे कल आहे, असे एका सर्वेक्षणातून बुधवारी पुढे आले.
विम्याविषयी जागरूकता वाढत असून त्यातील वाढीबाबत सकारात्मक कल ‘मनीनाईन’च्या पर्सनल फायनान्स पल्स या सर्वेक्षणाने दर्शविला आहे. २०२३ मध्ये २७ टक्क्यांहून अधिक कुटुंबांनी आयुर्विमा घेतला आहे. वर्ष २०२२ च्या सर्वेक्षणात हे प्रमाण १९ टक्के नोंदवले गेले होते. देशातील २० राज्यांमधील ३५,००० हून अधिक कुटुंबांच्या प्रतिसादांवर आधारित सर्वेक्षणानुसार, ५३ टक्के कुटुंबांनी अजूनही आरोग्य विमा संरक्षण घेतलेले नाही. शेअर बाजाराकडे ओढा वाढतो आहे. शेअर बाजारातील गुंतवणूकदारांची टक्केवारी मागील वर्षाच्या तुलनेत ३ टक्क्यांवरून ९ टक्क्यांपर्यंत वाढली आहे. या व्यतिरिक्त, १० टक्के भारतीय कुटुंबांनी आता म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीचा मार्ग स्वीकारला आहे, २०२२ मध्ये ज्याचे प्रमाण ६ टक्के होते.
दक्षिणेतील बंगळुरू (६९ टक्के) आणि तिरुवनंतपुरम (६६ टक्के) ही शहरे सोने बचतीत आघाडीवर आहेत. विम्याच्या बाबतीत, मदुराई (८४ टक्के) अव्वल स्थानावर आहे, त्यानंतर अमरावती (७९ टक्के) आणि औरंगाबाद (७६ टक्के) यांचा क्रमांक लागतो. रिसर्च ट्रँगल इन्स्टिट्यूट (आरटीआय) इंटरनॅशनलच्या सहकार्याने हे सर्वेक्षण करण्यात आले आहे.