चेन्नई: देशातील जीवाश्म इंधनाची आयात आज ८७ टक्क्यांवर पोहोचली आहे. अशा इंधनावर आपण पाण्यासारखा पैसा खर्च करीत आहोत. पण याघडीला जर पाण्यावरतीच पैसा खर्च करून हायड्रोजन इंधन निर्मिती केली, तर आगामी काळात आर्थिक बचत होईल, असे सांगतानाच ‘इथेनॉल-मिथेनॉल’ निर्मितीच्या प्रकल्पांच्या मागे न लागता आगामी काळात हायड्रोजन इंधनावर भर देण्याचा सल्ला केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी चेन्नईत झालेल्या एका कार्यक्रमात दिला.
‘अशोक लेलॅन्ड’च्या स्वीच मालिकेतील ‘आयईव्ही-३ आणि आयईव्ही-४’ या हलक्या श्रेणीतील दोन मालवाहू वाहनांचे अनावरण गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी ते बोलत होते. स्वीच मालिकेतील अर्थात विजेवर चालणाऱ्या दुमजली बस धावताहेत. त्यात आता हलक्या मालवाहू वाहनांची भर पडली आहे. ‘अशोक लेलॅन्ड आणि स्वीच मोबिलिटी’चे अध्यक्ष धीरज हिंदूजा यांनी विजेवर चालणाऱ्या वाहनांच्या निर्मितीसह येणाऱ्या काळात शाश्वत मालवाहतूक आणि दीर्घ अंतराच्या वाहतुकीत येणाऱ्या आव्हानांवर मात करण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना बळ देण्याचा आमचा निर्धार असल्याचे सांगितले.
अशोक लेलॅन्डचा ७५ वर्षांचा काळ अनेक आव्हानांचा आणि यशाने व्यापलेला आहे. आजघडीला पर्यावरण हे मोठे आव्हान सर्वासमोर आहे. ते पेलण्यासाठी अशोक लेलॅन्ड आणि स्वीच मोबिलिटीचे बाहू क्षमता बाळगून असतील, असा विश्वासही त्यांनी या वेळी व्यक्त केला. ‘अशोक लेलॅन्ड’चे व्यवस्थापकीय संचालक सीईओ शेनू अगरवाल यांनी देशातील दळणवळणाच्या भवितव्याला आकार देण्याचा कंपनीचा मानस व्यक्त केला.