मुंबई: जागतिक पातळीवरील आघाडीच्या १०० विलासी नाममुद्रांमध्ये मलाबार गोल्ड आणि टायटन यांच्यासह चार भारतीय नाममुद्रांनी मानांकन मिळविले आहे. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या ‘डेलॉइट ग्लोबल लक्झरी ब्रँड २०२३’ या प्रतिष्ठित सूचीत, मलाबार गोल्ड अँड डायंमड १९ व्या स्थानी असून, ती देशातील आघाडीची आघाडीची आंतरराष्ट्रीय आभूषण नाममुद्रा ठरली आहे.
हेही वाचा >>> झेनिथ ड्रग्जची ४०.६७ कोटींची भागविक्री खुली
जागतिक पातळीवर टायटन २४ व्या स्थानी, तर कल्याण ज्वेलर्स आणि जॉय आलुक्कास यांनी अनुक्रमे ४६ व ४७ व्या स्थान पटकावले आहे. सेन्को गोल्ड अँड डायमंड आणि थंगामईल ज्वेलरी यांनी अनुक्रमे ७८ वे आणि ९८ वे स्थान पटकावले आहे. मागील वर्षी कोझिकोडस्थित मलाबार गोल्ड अँड डायंमडचे उत्पन्न ४ अब्ज डॉलर तर टायटनचे उत्पन्न ३.६७ अब्ज डॉलर होते.
देशातील लक्झरी नाममुद्रांनी इतक्या संख्येने जगभरात प्रतिष्ठित सूचीत स्थान मिळवणे हे देशांतर्गत विलासी आणि ऐषारामी वस्तूंच्या बाजारपेठेचा होत असलेला विस्तार दर्शवणारे चित्र आहे. महागड्या वस्तूंची देशांतर्गत बाजारपेठ वाढत असून, ग्राहकांची पसंती आणि मोठी मागणीही त्यांना मिळत आहे, असे डेलॉइटच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. जागतिक अग्रणी १०० लक्झरी च्या यादीत फ्रान्समधील एलएमव्हीएच फॅशन ग्रुपची नाममुद्रा अव्वल स्थानावर आहे.