मुंबई: झोहो कॉर्पची माहिती-तंत्रज्ञान व्यवसायातील अंग असलेल्या ‘मॅनेजइंजिन’ने कृत्रिम प्रज्ञा (एआय) आणि मशीन लर्निंग प्रणालींवर लक्ष केंद्रित केले असून, भारतात वेगाने सुरू असलेल्या डिजिटल परिवर्तनांत अग्रणी राहून अधिकाधिक योगदान देण्याची कंपनीची महत्त्वाकांक्षा आहे. यातून २०२६ आर्थिक वर्षांत १०० कोटी डॉलरच्या (सुमारे ८,७५० कोटी रुपयांच्या) महसुली उलाढालीचे तिचे लक्ष्य आहे.
देशातील वित्तीय सेवा क्षेत्र हे सर्वात जास्त डिजिटलाइज्ड क्षेत्रांपैकी एक असून, तेथे ‘एआय’ समर्थित नवोपक्रमासाठी सर्वाधिक वाव आहे, असे मॅनेजइंजिनचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश गणेशन यांनी पत्रकारांशी संवाद साधताना स्पष्ट केले. या प्रसंगी झोहो कॉर्पचे एआय संशोधन विभागाचे संचालक रामप्रकाश रामामूर्ती हेही उपस्थित होते. एआय-चालित उपायांच्या वाढत्या मागणीचा फायदा घेण्याचे उद्दिष्ट ठेवताना, विशेषत: सायबर सुरक्षा आणि प्रसंगानुरूप व्यवस्थापन यासारख्या क्षेत्रात भारतात व्यवसायवाढीच्या संधी खुणावत असल्याचे गणेशन म्हणाले.
‘मॅनेजइंजिन’कडून ६५ हून अधिक एंटरप्राइझ आयटी व्यवस्थापन साधने प्रस्तुत केली जात असून, ती व्यवसायांना नेटवर्क, सर्व्हर, अॅप्लिकेशन्स, सर्व्हिस डेस्क, अॅक्टिव्ह डिरेक्टरी, सुरक्षा उपाय, डेस्कटॉप आणि मोबाइल साधनांसह आयटी प्रणाली व्यवस्थापित करण्यास मदत करतात. कंपनीने २०१४ मध्ये पहिल्यांदा ‘एआय’चालित साधनांचे अनावरण केले आणि तेव्हापासून विविध एआय-समर्थिक वैशिष्ट्यांचा त्यांच्या उपाययोजनांत अंतर्भाव केला आहे. जगभरात विविध देशांत विस्तार फैलावलेल्या कंपनीची अमेरिका ही सर्वात मोठी बाजारपेठ असून, त्या पाठोपाठ ब्रिटनचा क्रमांक येतो.
तथापि वाढत्या डिजिटलीकरणासह जगात एआय नवोपक्रमांचे प्रमुख केंद्र म्हणून उदयास येण्याची भारताची क्षमता पाहता, अमेरिकेपाठोपाठ दुसरी मोठी बाजारपेठ म्हणून भारताबाबत कंपनीच्या मोठ्या आशा असल्याचे गणेशन यांनी स्पष्ट केले. भारतात सध्या विविध उद्योग क्षेत्रातील ७५० कंपन्यांना मॅनेजइंजिनकडून सेवा प्रदान केली जाते. तथापि जगभरातील ८ लाख व्यवसाय कंपनीचे ग्राहक आहेत. विदा गोपनीयता आणि सार्वभौमत्व हे कंपनीच्या कार्यप्रणालींचे दोन मोठे आधारस्तंभ आहेत. यासाठी तिच्याकडून जगभरात सुमारे १८ डेटा सेंटर चालविले जातात, ज्यापैकी दोन भारतात आहेत, असे झोहो कॉर्पोरेशनचे सहसंस्थापक आणि मुख्याधिकारी शैलेश दवे म्हणाले.