वृत्तसंस्था, नवी दिल्ली
देशातील निर्मिती क्षेत्राची सक्रियता सरलेल्या ऑगस्ट महिन्यात तीन महिन्यांतील उच्चांकी पातळीवर पोहोचल्याचे स्पष्ट होत असून, नवीन कार्यादेश आणि पर्यायाने उत्पादनांत वाढीने ही गतिमानता आल्याचे मासिक सर्वेक्षणाच्या शुक्रवारी आलेल्या निष्कर्षातून समोर आले आहे.
एस ॲण्ड पी ग्लोबल इंडियाने निर्मिती उद्योगातील कंपन्यांच्या खरेदी व्यवस्थापकांमध्ये केलेल्या सर्वेक्षणाअंती काढलेला पीएमआय निर्देशांक ऑगस्ट महिन्यात ५८.६ गुणांवर नोंदविण्यात आला. जुलै महिन्यात तो ५७.७ गुणांवर होता. निर्देशांकाने ऑगस्ट महिन्यात मे महिन्याची उच्चांकी पातळी नोंदविली आहे. ऑगस्ट महिन्यात निर्मिती क्षेत्राचा पीएमआय निर्देशांक सलग २५ व्या महिन्यात ५० गुणांकावर नोंदविला गेला आहे. हा गुणांक ५० च्या वर असल्यास विस्तारपूरकता आणि त्याखाली असल्यास आकुंचन दर्शवितो. करोना टाळेबंदी सैल झाल्यापासून या निर्देशांकात निरंतर सकारात्मकता दिसलेली आहे.
आणखी वाचा-प्रमुख क्षेत्रांची जुलै महिन्यात ८ टक्के दराने वाढ
वाढ रोजगार निर्मितीविना!
निर्मिती क्षेत्राच्या वाढीचा वेग ऑगस्टमध्ये अधिक असला तरी त्याचे रूपांतर रोजगार निर्मितीत झालेले नाही. सलग पाचव्या महिन्यात रोजगार निर्मितीचा दर सकारात्मक राहिला असला तरी तो ऑगस्टमध्ये एप्रिलनंतरच्या नीचांकी पातळीवर घसरला आहे.
भारताच्या निर्मिती क्षेत्राचा वेग ऑगस्टमध्ये वाढला आहे. यातून देशातील निर्मिती क्षेत्राचे चांगले चित्र समोर आले आहे. नवीन कार्यादेश आणि उत्पादनात वाढ झाली असून, त्यातून दुसऱ्या तिमाहीत आर्थिक विकासाला गती मिळाली आहे. -पॉलियाना डी लिमा, अर्थतज्ज्ञ, एस अँड पी ग्लोबल