पीटीआय, नवी दिल्ली

भाडेतत्त्वावर हॉटेल आणि खोल्या उपलब्ध करून देणारी नाममुद्रा ‘ओयो’ने सरलेल्या आर्थिक वर्षातील मार्च तिमाहीत प्रथमच सकारात्मक रोख प्रवाह नोंदवला आहे, अशी माहिती कंपनीचे संस्थापक आणि समूह मुख्याधिकारी रितेश अग्रवाल यांनी गुरुवारी दिली. आर्थिक वर्ष २०२२-२३ च्या पहिल्या सहामाहीत कंपनीने ६३ कोटी रुपयांच्या नफ्याची नोंद केली आहे. त्या आधीच्या वर्षात याच कालावधीत कंपनीला २८० कोटी रुपयांचा तोटा झाला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कंपनीच्या युरोपातील घरांच्या व्यवसायात वाढ झाली असून, ग्राहकांनी उन्हाळी सुट्यांसाठी आगाऊ नोंदणी केली. शिवाय जगभरातील सर्वच ठिकाणी हॉटेल आणि खोल्यांसाठी होणाऱ्या नोंदणीमध्ये वाढ झाली असल्याने यंदा कंपनीकडे ९० कोटी रुपयांची नक्त गंगाजळी शिल्लक आहे. कंपनीच्या तिमाही अहवालानुसार, तिच्याकडे २,७०० कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी उपलब्ध आहे. परिणामी कंपनीला चालू आर्थिक वर्षात ८०० कोटी रुपयांचा महसूल मिळणे अपेक्षित आहे.

हेही वाचा – एअर इंडिया आपल्या ताफ्यात ५०० नवीन विमाने जोडणार, १००० हून अधिक पदांची भरती करणार

आयपीओसाठी नव्याने प्रस्ताव

चालू कॅलेंडर वर्षात प्रारंभिक समभाग विक्रीसाठी पुन्हा नव्याने मसुदा प्रस्ताव सादर करण्याच्या भांडवली बाजार नियामक ‘सेबी’च्या निर्देशानुसार, कंपनीने मार्च महिन्यात नव्याने प्रस्ताव सादर केला आहे. यापूर्वी ‘आयपीओ’च्या माध्यमातून ८,४३० कोटी रुपयांचा निधी उभारणीचा प्रस्ताव (डीआरएचपी) तिने सप्टेंबर २०२१ मध्ये सेबीला सादर केला होता. त्यानुसार ७,००० कोटी रुपयांचे नवीन समभाग जारी करण्याचे तर विद्यमान भागधारकांकडील आंशिक हिस्सा विक्रीच्या माध्यमातून १,४३० कोटी रुपये उभारण्याचे प्रस्तावित करण्यात आले होते.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: March quarter profitable for oyo positive cash flow recorded for the first time fresh proposal submitted to sebi for ipo ssb