मुंबई: अदानी समूहावरील हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालातील आरोप तथ्यहीन ठरवणाऱ्या अमेरिकी सरकारच्या निर्वाळ्यानंतर मंगळवारच्या सत्रात अदानी समूहातील कंपन्यांच्या समभागांनी २० टक्क्यांपर्यंत उसळी घेतली. परिणामी समूहातील कंपन्यांचे एकत्रित बाजारभांडवल १३ लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. वेगाने घोडदौडीसह स्वप्नवत साम्राज्यविस्तार साधणाऱ्या अदानी समूहाची चाल अमेरिकी हिंडेनबर्ग रिसर्चच्या गैरव्यवहार आणि लबाड्यांचा आरोप करणाऱ्या अहवालानंतर पुरती मंदावली होती.
गेल्या आठवड्यात अमेरिकेतील इंटरनॅशनल डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशनने (डीएफसी) श्रीलंकेतील कोलंबो येथील बंदराच्या विकासासाठी अदानी समूहाला वित्तपुरवठा करण्याआधी केलेल्या तपासातून हिंडेनबर्ग रिसर्चचे आरोप निराधार असल्याच्या निष्कर्षाप्रत म्हटले आहे, असे ‘ब्लूमबर्ग’ने दिलेल्या वृत्ताचा दावा आहे. शिवाय यापूर्वी हिंडेनबर्गप्रकरणी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या समितीने अदानी समूहाला दिलासा दिला असून, प्रथमदर्शनी समितीला समूहाच्या विरोधात कोणतेही पुरावे सापडले नाहीत, असे म्हटले आहे. तर गेल्या आठवड्यात ‘सेबी’कडून चौकशीची मागणी करणाऱ्या याचिकांबाबत सर्वोच्च न्यायालयाने निकाल राखून ठेवताना, हिंडेनबर्ग अहवालातील आरोपांच्या सत्यतेबाबतही प्रश्न उपस्थित केले होते. यातून सलग दुसऱ्या आठवड्यात अदानी समूहाला दिलासा मिळाल्याने समभागांमध्ये तेजी कायम आहे. परिणामी सर्व १० सूचिबद्ध कंपन्यांनी विद्यमान आठवड्यात बाजारभांडवलात भर घातल्याने ते एकत्रित १३ लाख कोटी रुपयांच्या पातळीवर पोहोचले आहे.
हेही वाचा… सेवा क्षेत्राची वाढ मंदावली! नोव्हेंबरमध्ये वर्षातील नीचांकी गुणांकांची नोंद
समभागांमध्ये तेजी किती?
मुंबई शेअर बाजारात अदानी ग्रीन एनर्जीचे समभाग २० टक्क्यांनी वाढून १,३४८ रुपयांवर बंद झाला. अदानी एनर्जी सोल्युशन्स २० टक्क्यांनी वाढून १०८२.६० रुपयांवर, अदानी टोटल गॅस १९.८८ टक्क्यांनी वाढून ८७७.७५ रुपयांवर, तर अदानी एंटरप्राइझचे समभाग १७.०३ टक्क्यांनी वाढले आणि २,९६०.१० रुपये प्रतिसमभागावर स्थिरावला. अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन (एपीएसईझेड) १५.१५ टक्क्यांनी वाढून १,०११.८५ रुपयांवर, एनडीटीव्ही १८.८४ टक्क्यांनी वाढून २६६.८५ रुपयांवर, अदानी विल्मर ९.९४ टक्क्यांनी वाढून ३८०.६५ रुपयांवर आणि अदानी पॉवर १५.९१ टक्क्यांनी वाढून ५३८.९५ रुपयांवर बंद झाला. तसेच, अंबुजा सिमेंटचा शेअर ७.२७ टक्क्यांनी वाढून प्रत्येकी ५०९.०५ रुपये झाला आणि एसीसी ८.२० टक्क्यांनी वाढून २,१८५ रुपयांवर स्थिरावला.
हेही वाचा… जागतिक उत्पादन केंद्र बनण्याची भारताला संधी – एस अँड पी; २०३० पर्यंत जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनण्याचाही दावा
अदानींच्या संपत्तीत ८३ हजार कोटींची भर
सरलेल्या सात सत्रात गौतम अदानी यांच्या वैयक्तिक संपत्तीमध्ये सुमारे ८३,००० कोटी रुपयांची (१० अब्ज डॉलर) भर पडली आहे. ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकानुसार, जागतिक स्तरावर ते श्रीमंतांच्या यादीत १६ व्या स्थानी पोहोचले आहेत. अदानी समूहाचे सर्वेसर्वा गौतम अदानी यांच्याकडे आता ७०.३ अब्ज डॉलरची संपत्ती आहे. तर ९०.४ अब्ज डॉलरच्या एकूण संपत्तीसह मुकेश अंबानी जागतिक श्रीमंतांच्या क्रमवारीत १३ व्या स्थानी दुसरे भारतीय अब्जाधीश आहेत.