मुंबई: गेल्या १० महिन्यांतील सर्वात मोठ्या घसरणीचा वार सोसल्याच्या दुसऱ्याच दिवशी भांडवली बाजारांनी पुन्हा उसळी घेतली. आशियाई आणि युरोपीय बाजारांत झालेल्या जोरदार खरेदीतून स्फुरण चढल्याने, मंगळवारी देशांतर्गत बाजारात सेन्सेक्सने १,०८९ अंशांची दमदार उसळी घेतली.
रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणातून व्याजदर कपात केली जाण्याबाबत आशावादही बाजारात खरेदीसाठी उत्साहदायी ठरला.दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स १,०८९.१८ अंशांची म्हणजेच १.४९ टक्क्यांची कमाई करत ७४,२२७.०८ पातळीवर स्थिरावला. त्यातील आघाडीच्या ३० कंपन्यांपैकी २९ कंपन्यांचे समभाग सकारात्मक पातळीवर बंद झाले. दिवसभरात त्याने १,७२१.४९ अंशांची झेप घेत ७४,८५९.३९ या सत्रातील उच्चांकी पातळीला स्पर्श केला होता. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीने ३७४.२५ अंशांची (१.६९ टक्के) भर घातली आणि त्याने २२,५३५.८५ पातळीवर बंद नोंदविला.
अमेरिकेने उडवून दिलेल्या व्यापार युद्धाच्या धुरळ्यामुळे महामंदी येण्याच्या भीतीपोटी जागतिक शेअर बाजार घसरले. परिणामी सोमवारच्या सत्रात सेन्सेक्स २,२२६.७९ अंशांनी, तर निफ्टी ७४२.८५ अंशांनी घसरले होते. ही गेल्या १० महिन्यांतील एका सत्रातील सर्वात मोठी घसरण होती. ट्रम्पच्या व्यापार करासंबंधित धोरणांमुळे अमेरिकेत मंदी आणि महागाई वाढण्याची भीती असल्याने गुंतवणूकदारांमध्ये अजूनही चिंतेचे वातावरण कायम आहे.जागतिक बाजारपेठेतील सकारात्मक संकेतांमुळे देशांतर्गत भांडवली बाजारात तेजीवाल्यांनी बाजाराचा ताबा घेतला. बहुतेक देश ट्रम्प यांच्या व्यापार धोरणाच्या आव्हानावर मात करण्यासाठी मार्ग शोधतील, या आशेवर अमेरिकेच्या करवाढीची चिंता थोडी कमी झाली. मुख्यत्वे उपभोग-केंद्रित अर्थव्यवस्था असल्याने, इतर काही देशांच्या तुलनेत भारतावर या करवाढीचा मर्यादित परिणाम संभवतो, असे मेहता इक्विटीज लिमिटेडचे वरिष्ठ उपाध्यक्ष (संशोधन) प्रशांत तापसे म्हणाले.
मंगळवारच्या सत्रात, पॉवर ग्रिड वगळता सेन्सेक्समधील सर्व कंपन्या सकारात्मक पातळीवर बंद झाल्या. टायटन, बजाज फायनान्स, स्टेट बँक, लार्सन अँड टुब्रो, ॲक्सिस बँक, बजाज फिनसर्व्ह, एशियन पेंट्स आणि झोमॅटो यांचे समभाग तेजीत होते. सोमवारच्या घसरणीनंतर जागतिक बाजारपेठेतही पुनरागमन झाले. मुंबई शेअर बाजाराच्या आकडेवारीनुसार, सोमवारी परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (एफआयआय) ९,०४०.०१ कोटी रुपये मूल्याचे समभाग विकले, तर देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (डीआयआय) १२,१२२.४५ कोटी रुपयांचे समभाग खरेदी केले.
अमेरिकेशी द्विपक्षीय करार करण्यासाठी अनेक देशांकडून दिसलेले स्वारस्य आणि सकारात्मक जागतिक संकेतांनंतर, देशांतर्गत बाजारपेठेत सुधारणा दिसून आली. – विनोद नायर, संशोधन प्रमुख, जिओजित इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेड
गुंतवणूकदारांना ७.३२ लाख कोटींची श्रीमंती
बाजार पुन्हा सावरल्याने गुंतवणूकदार मंगळवारी ७.३२ लाख कोटी रुपयांनी श्रीमंत झाले. तीन सत्रातील घसरणीनंतर, सेन्सेक्सने मंगळवारच्या सत्रात जवळपास ११०० अंशांची कमाई केली. यामुळे मुंबई शेअर बाजारातील सूचिबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल ७.३२ लाख कोटी रुपयांनी वाढून ३.९६ लाख कोटी रुपयांवर (४.६२ ट्रिलियन डॉलर) पोहोचले. मंदीच्या भीतीमुळे जागतिक बाजारपेठेत झालेल्या घसरणीदरम्यान सोमवारी, सूचिबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल एका सत्रात १४.०९ लाख कोटींनी घरंगळले होते.
गुंतवणूकदारांना ७.३२ लाख कोटींची श्रीमंती
बाजार पुन्हा सावरल्याने गुंतवणूकदार मंगळवारी ७.३२ लाख कोटी रुपयांनी श्रीमंत झाले. तीन सत्रातील घसरणीनंतर, सेन्सेक्सने मंगळवारच्या सत्रात जवळपास ११०० अंशांची कमाई केली. यामुळे मुंबई शेअर बाजारातील सूचिबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल ७.३२ लाख कोटी रुपयांनी वाढून ३.९६ लाख कोटी रुपयांवर (४.६२ ट्रिलियन डॉलर) पोहोचले. मंदीच्या भीतीमुळे जागतिक बाजारपेठेत झालेल्या घसरणीदरम्यान सोमवारी, सूचिबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल एका सत्रात १४.०९ लाख कोटींनी घरंगळले होते.