मुंबई : देशांतर्गत भांडवली बाजारात बुधवारच्या अस्थिर सत्रात प्रमुख निर्देशांकात मोठे चढ-उतार दिसून आले. सकल देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) मंदावण्याची भीती आणि कंपन्यांच्या तिमाही आर्थिक कामगिरीच्या हंगामापूर्वी गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा घेतला. शिवाय निर्देशांकात सर्वाधिक योगदान राखणाऱ्या एचडीएफसी, आयसीआयसीआय बँकेच्या समभागातील घसरणीने बाजारमंदीला चालना दिली.
दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये ५०.६२ अंशांची घसरण झाली आणि तो ७८,१४८.४९ पातळीवर स्थिरावला. दिवसभरात ७१२.३२ अंशांनी गडगडून त्याने ७७,४८६.७९ या सत्रातील नीचांकी पातळीला स्पर्श केला होता. मात्र दुपारच्या सत्रात टीसीएस आणि रिलायन्स इंडस्ट्रीजच्या समभागांमध्ये गुंतवणूकदारांनी केलेल्या खरेदीने बाजारातील घसरण रोखण्यात यश आले. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी १८.९५ अंशांनी किरकोळ घसरून २३,६८८.९५ पातळीवर बंद झाला.
हेही वाचा >>>आयटीसीच्या शेअरच्या भावात घसरणीचे कारण काय? विलग झालेल्या हॉटेल व्यवसायाचे मूल्य अपेक्षेपेक्षा सरस
मंदावलेला आर्थिक विकासाचा अंदाज आणि कंपन्यांच्या तिसऱ्या तिमाहीतील आर्थिक कामगिरीच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांच्या सावधगिरीने बाजारात अस्थिरता वाढवली. मात्र ‘ब्लू-चिप’ कंपन्यांच्या समभाग खरेदीने आणि आगामी अर्थसंकल्पातील संभाव्य सुधारणांच्या अपेक्षेने बाजार दिवसाच्या नीचांकी स्थितीतून सावरला. जागतिक पातळीवर फेडरल रिझर्व्हच्या व्याजदर कपातीस विलंब होण्याच्या शक्यतेने मात्र चिंतेत भर घातली आहे, असे निरीक्षण जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी नोंदवले.
सेन्सेक्समधील आघाडीच्या ३० कंपन्यांमध्ये अदानी पोर्ट्स, अल्ट्राटेक सिमेंट, लार्सन अँड टुब्रो, सन फार्मा, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, एनटीपीसी आणि स्टेट बँकेच्या समभागात घसरण झाली. तर टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, रिलायन्स इंडस्ट्रीज, आयटीसी, एशियन पेंट्स, एचसीएल टेक आणि मारुतीचे समभाग तेजीसह स्थिरावले.
सेन्सेक्स ७८.१४८.४९ -५०.६२ (-०.०६%)
निफ्टी २३,६८८.९५ -१८.९५ (-०.०८%)
तेल ७७.६६ ०.७९ टक्के
डॉलर ८५.८७ १३ पैसे