नवी दिल्ली : देशात सर्वाधिक वाहने विकणाऱ्या मारुती सुझुकीसह, बहुतांश वाहन निर्मात्यांनी, वाढलेल्या उत्पादन खर्चाची भरपाईमुळे किंमतवाढ जाहीर केली आहे. येत्या १ जानेवारीपासून प्रवासी वाहनांच्या किमती त्यामुळे लक्षणीय वाढतील. मारुती सुझुकीने शुक्रवारी भांडवली बाजाराला दिलेल्या माहितीप्रमाणे, सर्वच पातळ्यांवर वाढलेली महागाई पाहता कंपनीवर उत्पादन खर्चाचे गणित जुळवण्याचा ताण बळावल्याचे म्हटले आहे. खर्चाला शक्य तितकी आवर घालून किंमत न वाढवण्याचा कंपनीचा प्रयत्न सुरू होता. परंतु आता खर्चातील वाढीमुळे याचा काही प्रमाणात परिणाम ग्राहकांवर होणार आहे.
हेही वाचा >>> विकास दराचा अंदाज कमी; रिझर्व्ह बँकेकडून चालू आर्थिक वर्षासाठी ६.६ टक्क्यांचे अनुमान
कंपनीकडून किमतीत १ जानेवारीपासून ४ टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात येणार असून, ही वाढ मोटारींच्या मॉडेलनुसार वेगवेगळी असेल. ह्युंदाईने आधीच त्यांच्या वाहनांच्या किमती १ जानेवारी २०२५ पासून सुमारे २५,००० रुपयांनी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. वाहन उत्पादक कंपन्यांवर मागील काही काळापासून सुट्या भागांच्या वाढलेल्या किमतीचा दबाव असल्याचे कारण तिने दिले आहे. महिंद्र अँड महिंद्र देखील १ जानेवारीपासून त्यांच्या एसयूव्ही आणि वाणिज्य वाहनांच्या किमती ३ टक्क्यांपर्यंत वाढविणार आहे. मर्सिडीज-बेंझ, बीएमडब्ल्यू आणि ऑडी या विविध लक्झरी वाहन उत्पादकांनी पुढील महिन्यापासून वाहनांच्या किमती वाढवण्याची घोषणा केली आहे.