पीटीआय, नवी दिल्ली
देशांतर्गत आघाडीची प्रवासी वाहन कंपनी मारुती सुझुकीने विविध वाहनांच्या किमतीमध्ये २,५०० रुपये ते ६२,००० रुपयांनी वाढ करण्याची घोषणा केली आहे. येत्या ८ एप्रिलपासून नवीन किमती लागू होणार आहेत. गेल्या महिन्यात कंपनीने किमत वाढीची घोषणा केली होती. वाढता उत्पादन खर्च, कार्यचालन खर्च, नियामक बदल आणि वैशिष्ट्यांच्या वाढीमुळे कंपनीने वाहनांच्या किमती वाढवण्याची योजना आखली आहे, असे मारुती सुझुकीने बाजारमंचांना कळवले आहे. ग्राहकांवर किमती वाढीचा होणार परिणाम मर्यादित कंपनीने प्रयत्न केले असले तरी, वाढलेल्या खर्चाचा काही बोजा ग्रहकांवर टाकणे अनिवार्य आहे, असे कंपनीने म्हटले आहे.
कॉम्पॅक्ट एसयूव्ही फ्रॉन्क्सच्या किमतीत २,५०० रुपये, डिझायर टूर एसच्या किमतीत ३,००० रुपये आणि इतर काही वाहनांच्या किमतीत १२,५०० रुपयांनी वाढ करण्यात येणार आहे. वॅगन आरची किंमत १४,००० रुपयांनी आणि इको व्हॅनची किंमत २२,५०० रुपयांनी वाढणार आहे. याशिवाय, ८ एप्रिलपासून एसयूव्ही ग्रँड विटाराची किंमत ६२,००० रुपयांनी वाढेल, असे कंपनीने म्हटले आहे. याआधी कंपनीने १ फेब्रुवारीपासून विविध वाहनांच्या किमती ३२,५०० रुपयांपर्यंत वाढवल्या होत्या.
बुधवारच्या सत्रात, मारुती सुझुकीचे समभाग २.०९ टक्क्यांनी वाढून ११,७१५.०५ रुपयांवर बंद झाला. सध्याच्या शेअर बाजारभावानुसार, कंपनीचे बाजारभांडवल ३.६८ लाख कोटी रुपये आहे.