पुणे : मास्टरकार्डने पुण्यात अत्याधुनिक तंत्रज्ञान केंद्र सुरू केले असून, सुमारे सहा हजार तंत्रज्ञ आणि अभियंते कार्यरत असल्याने हे मास्टरकार्डचे हे जगातील सर्वात मोठे तंत्रज्ञान केंद्र ठरले आहे.
मास्टरकार्डचे अध्यक्ष व मुख्य तंत्रज्ञान अधिकारी एड मॅकलॅघन यांच्या उपस्थितीत या केंद्राचे उद्घाटन मंगळवारी झाले. याप्रसंगी ते म्हणाले की, मास्टरकार्डच्या जागतिक तंत्रज्ञान धोरणात पुण्यातील केंद्र अतिशय महत्त्वाची भूमिका बजावेल. आमच्या जगभरातील तंत्रज्ञान विभागांमध्ये हा महत्त्वाचा दुवा असेल. हे केंद्र इतर तंत्रज्ञान केंद्रासोबत जगाला आकार देणाऱ्या आणि अर्थव्यवस्थांना भक्कम करणाऱ्या क्रांतिकारी तंत्रज्ञानाची उभारणी करेल.
हेही वाचा >>>‘रेमिटन्स’ प्रक्रिया गतिमान, किफायती बनावी; रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांची भूमिका
या केंद्रात सॉफ्टवेअर विकासापासून, वित्त, विदा, विदा संरचना आणि सायबरसुरक्षा क्षेत्रातील तंत्रज्ञ कार्यरत असतील. सध्या मास्टरकार्डची पुण्यासह अर्लिंग्टन, डब्लिन, न्यूयॉर्क, सेंट लुईस, सिडनी आणि व्हँक्यूव्हर येथे तंत्रज्ञान केंद्रे आहेत. पेमेंट सुरक्षा, सायबर सुरक्षा, फसवणुकीचा शोध आणि डिजिटल ओळख या माध्यमातून मास्टरकार्डच्या जागतिक सेवेत ते योगदान देईल. याचबरोबर भारतात वित्तीय समावेशनासाठीचा कम्युनिटी पास मंच आणि पेमेंट पास की सेवेची सुरुवात करण्यात हे केंद्र महत्त्वाची भूमिका बजावेल.