पीटीआय, नवी दिल्ली

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

देशाच्या सेवा क्षेत्राची सक्रियता सरलेल्या मेमध्ये महिनावार म्हणजेच एप्रिलच्या तुलनेत किंचित मंदावून तिने पाच महिन्यांतील नीचांकी स्तर गाठला, असे बुधवारी जाहीर झालेल्या मासिक सर्वेक्षणातून समोर आले.

भारतातील सेवा व्यवसायातील खरेदी व्यवस्थापकांचा कल दर्शविणारा ‘एचएसबीसी इंडिया सर्व्हिसेस पीएमआय’ निर्देशांक मे महिन्यात ६०.२ गुणांवर नोंदला गेला. एप्रिलमध्ये हा गुणांक ६०.८ होता. निर्देशांकाने डिसेंबरनंतरची नीचांकी पातळी गाठली आहे. एप्रिलच्या तुलनेत मेमध्ये सेवा क्षेत्रातील क्रियाकलापातील वाढीचा वेग मंदावला असला तरी त्याचा दर सकारात्मक आहे. सेवा क्षेत्राचा निर्देशांक ५० गुणांवर नोंदला गेल्यास विस्तार तर ५० गुणांखाली नोंदला गेल्यास आकुंचन झाल्याचे मानले जाते. हा निर्देशांक ऑगस्ट २०२१ पासून ५० गुणांवर नोंदविला गेला आहे.

हेही वाचा >>>ध्वनिलहरींचा लिलाव २५ जूनपर्यंत लांबणीवर

देशांतर्गत नवीन कार्यादेशातील वाढ कमी झाल्याने सेवा क्षेत्राच्या वाढीचा वेग मेमध्ये मंदावला आहे. याच वेळी नवीन व्यवसायात मोठी वाढ नोंदविण्यात आली आहे. यामुळे व्यवसायाचा आत्मविश्वास आठ महिन्यांतील उच्चांकी पातळीवर पोहोचला आहे. विक्रीतील वाढ, उत्पादकता नफा आणि मागणीतील वाढ यामुळे सेवा क्षेत्राच्या विस्ताराला बळ मिळाले आहे. मात्र, स्पर्धात्मकता आणि किमतीचा दबाव यामुळे काही प्रमाणात क्षेत्राची वाढ रोखली गेली आहे, असे सर्वेक्षणात नमूद करण्यात आले आहे.

भारतातील सेवा क्षेत्राची वाढ मे महिन्यात किंचित मंदावली. देशांतर्गत नवीन कार्यादेशांमध्ये घट झाली आहे. कच्चा माल आणि मजुरांचा खर्च वाढल्याने किमतीतही वाढ नोंदविण्यात आली आहे.– मैत्रेयी दास, अर्थतज्ज्ञ, एचएसबीसी इंडिया

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: May pmi at 5 month low print eco news amy