पीटीआय, नवी दिल्ली
ई-कॉमर्स क्षेत्रातील मीशो कंपनीने २५१ कर्मचाऱ्यांची कपात केली आहे. एकूण मनुष्यबळापैकी १५ टक्के कर्मचाऱ्यांना कंपनीने कमी केले आहे. खर्चात कपात करण्यासाठी आणि नफाक्षम राहण्याच्या दिशेने कंपनीची वाटचाल होण्यासाठी कर्मचारी कपातीचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत मीशोचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी विदित अत्रे यांनी कर्मचाऱ्यांनी ई-मेलद्वारे कळवले आहे. कामावरून कमी करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना भरपाई रक्कम दिली जाणार आहे.
कंपनीची २०२० ते २०२२ या कालावधीत दहा पटीने वाढ झाल्याचेही त्यांनी मेलमध्ये नमूद केले आहे.याबाबत मीशोचा प्रवक्ता म्हणाला की, कर्मचारी कपातीचा अतिशय कठीण निर्णय आम्ही घेतला आहे. किमान मनुष्यबळाच्या रचनेत काम करण्याचे आम्ही ठरवले आहे. कंपनी फायद्यात राहावी, यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. कर्मचाऱ्यांचे पद आणि कंपनीतील कालावधी यामुसार अडीच ते नऊ महिन्यांचे वेतन भरपाई रक्कम म्हणून दिले जाईल.