लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरणाने (एनसीएलटी) फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीने प्रवर्तित केलेल्या गीतांजली जेम्स या कंपनीला मोडीत काढण्याचे आदेश सोमवारी दिले. नादारी आणि दिवाळखोरी संहितेच्या कलम ३३ अन्वये झालेल्या या कार्यवाहीत, एनसीएलटीच्या मुंबई खंडपीठाने शंतनु रे यांची अवसायक (लिक्विडेटर) म्हणून नियुक्तीही केली आहे.

गीतांजली जेम्स आणि तिच्या प्रवर्तकांनी केलेल्या फसवणुकीच्या कारणास्तव, सक्तवसुली संचालनालय (ईडी) आणि केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग (सीबीआय) या सारख्या तपास यंत्रणांकडे अनेक प्रकरणांची चौकशी सुरू आहे. ईडीने चोक्सीची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश जारी केले आहेत. या पार्श्वभूमीवर हे पाऊल टाकण्यात आले आहे. भांडवली बाजारात ही कंपनी सूचिबद्ध असल्याने अवसायन प्रक्रियेच्या एनएसएलटीच्या आदेशाला, मुंबई शेअर बाजारानेही नोंद घेतली आहे.

आणखी वाचा-स्पाईसजेटच्या अजय सिंग यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले, क्रेडिट सुईसचे थकलेले पैसे १५ मार्चपर्यंत परत करण्याचे आदेश

एनसीएलटीपुढे कंपनीच्या दिवाळखोरीचे या प्रकरणाचा विहित १८० दिवसांचा कालावधी एप्रिल २०१९ मध्येच संपुष्टात आला आहे आणि कंपनीचे व्यवसाय चालू नसल्यामुळे, कंपनीच्या पुनरुज्जीवनाची शक्यता धूसर बनली होती, त्यामुळे निराकरण व्यावसायिक (आरपी) म्हणून कार्यरत विजय कुमार गर्ग यांनीच अवसायानाची ही याचिका दाखल केली होती. कंपनीने बँकांची आणि इतरांची एकूण १२,५५८ कोटींहून अधिक रकमेची देणी थकवली आहेत.

शेअर ठरला मातीमोल

पंजाब नॅशनल बँकेला फसवून देशाबाहेर फरार झालेला मेहुल चोक्सी आणि त्याची कंपनी गीतांजली जेम्स एकेकाळी भरपूर नाव-प्रसिद्धी, गुंतवणूकदारांची पसंतीही मिळविली होती. २०१० ते २०१२ दरम्यान शेअर बाजारात गीतांजली जेम्सच्या शेअर मूल्यातील चमक अनेकांसाठी डोळे दिपवणारी होती. गुंतवणूकदारांनाही त्याने चांगलेच मालामालही केले होते. पण आता कंपनीही नामशेष झाली आणि शेअरही मातीमोल झाला आहे.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mehul choksi promoted gitanjali gems finally extinct nclt orders winding up of company print eco news mrj
Show comments