Meta to lay off 3600 employees over low performance : फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअॅपची मूळ कंपनी मेटा ३,६०० कर्मचार्यांना नोकरीवरून काढून टाकणार आहे. ब्लूमबर्गने दिलेल्या रिपोर्टनुसार, अपेक्षेपेक्षा कमी कामगिरी असलेल्या कर्मचाऱ्यांना घरी पाठवले जाणार आहे. मेटाचे सीईओ मार्ग झुकरबर्ग यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्यांनी कामगिरीचा स्तर उंचावण्यासाठी तसेच कमी कामगिरी करणार्यांना वेगाने बाहेर काढण्यासाठी हे धोरण अवलंबले असल्याचे झुकरबर्ग यांनी म्हटले आहे.
मेटामधील ५ टक्के लोकांना नोकरीवरून काढले जाणार आहे. सप्टेंबर महिन्यामध्ये कंपनीत ७२,४०० कर्मचारी काम करत होते. एएफपीच्या रिपोर्टनुसार, अमेरिकेतली कर्मचार्यांना त्यांच्या नोकरीच्या स्थितीबद्दल १० फेब्रुवारी पर्यंत माहिती दिली जाणार आहे. जर इतर देशांमधील कर्मचाऱ्यांना त्यानंतर सूचित केले जाणार आहे.
“साधारणपणे आम्ही वर्षभरात कामासंबंधी अपेक्षा पूर्ण न करणाऱ्या लोकांचे व्यवस्थापन करतो, परंतु आता आम्ही या फेरीत मोठ्या प्रमाणात कामगिरीवर आधारित कपात करणार आहोत”, असे झुकरबर्ग म्हणाले आहेत. मागच्या काळात अपेक्षेपेक्षा कमी कामगिरी केलेल्या काही कर्मचार्यांच्या भविष्यातील कामगिरीबद्दल काही आशा असतील तर त्यांना कायम ठेवता येईल असंही त्यांनी यावेळी सूचित केले. कामावरून काढलेल्यांना चांगली भरपाई दिली जाईल असेही झुकरबर्ग म्हणाले आहेत. या वर्षाच्या अखेरीस नोकरीहून काढलेल्या कर्मचार्यांच्या जागी नवीन लोकांची नियुक्ती करण्याचा कंपनीचा विचार आहे.
मेटाने कर्मचारी कपात करण्याची ही पहिलीच वेळ नाही. कंपनीने नोव्हेंबर २०२२ मध्ये ११,००० कर्मचाऱ्यांना नारळ दिला होता आणि त्यानंतर काही महिन्यांतच आणखी १०,००० जणांना नोकरीहून काढण्यात आले होते.
मेटामध्ये काही धोरणात्मक बदल करण्यात आल्यानंतर ही घोषणा करण्यात आली आहे. ज्यामध्ये सातत्याने टीका केला जात असलेला अमेरिकेतली फॅक्ट चेकिंग प्रोग्राम देखील काढून टाकण्यात आला आहे. झुकरबर्ग यांनी कंटेंट मॉडरेशन पॉलिसीची देखील घोषणा केली आहे. याबरोबरच द्वेषपूर्ण वक्तव्याबाबत नियम शिथील करण्यात आले आहेत. तसेच लिंग किंवा स्थलांतर वादग्रस्त विषयांवरील निर्बंध देखील कमी केले आहेत .