पुणे : कॉसमॉस बँकेच्या व्यवस्थापन मंडळाच्या अध्यक्षपदी बँकेचे माजी अध्यक्ष सीए मिलिंद काळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बँकेचा वाढत जाणारा विस्तार आणि व्यवसाय यांचा विचार करून संचालक मंडळाने व्यवस्थापन मंडळाची पुनर्रचना केल्याचे गुरुवारी स्पष्ट केले.
बँकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष ॲड. प्रल्हाद कोकरे, उपाध्यक्ष सीए यशवंत कासार आणि व्यवस्थापकीय संचालिका अपेक्षिता ठिपसे यांनी गुरूवारी आयोजित पत्रकार परिषदेत नवीन व्यवस्थापकीय मंडळासंबंधी माहिती दिली. मंडळाच्या सदस्यांमध्ये सीए जयंत बर्वे, ॲड. अनुराधा गडाळे, ॲड. मुकेशकुमार शहा, गजानन गोडबोले, संजीव खडके, सुनिता भोर, सुशीलकुमार सोमाणी, नितीन पटवर्धन, डॉ. अच्युथा जॉयस, ॲड. अजय सूर्यवंशी आणि विजय कुलकर्णी यांचा समावेश आहे.
हेही वाचा >>> ‘महाबँके’ला १,४०६ कोटींचा तिमाही नफा; ’नेट एनपीए’चे प्रमाण घटून ०.२ टक्क्यांवर
यावेळी बोलताना ॲड. प्रल्हाद कोकरे म्हणाले, व्यवस्थापन मंडळामध्ये बँकेच्या आधीच्या संचालक मंडळातील तीन संचालकांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांच्या अनुभवाचा फायदा बँकेस होईल. व्यवस्थापन मंडळातील सर्व सदस्य हे विविध क्षेत्रातील तज्ज्ञ असून त्यांची मदत बँकेची ध्येयधोरणे ठरवताना आणि त्यांची प्रभावीपणे अंमलबजावणी करताना होणार आहे.
आतापर्यंत १९ बँकांचे विलीनीकरण कॉसमॉस बँकेने आतापर्यंत अडचणीत आलेल्या एकूण १९ लहान सहकारी बँकांचे विलीनीकरण करून घेतले आहे. नुकतेच बंगळुरूतील दि नॅशनल को-ऑपरेटीव्ह बँकेचे विलीनीकरण करून घेण्यात आले. या विलीनीकरणामुळे कॉसमॉस बँकेच्या एकूण १८३ शाखा व व्यवसाय ३६,५०० कोटी रुपयांहून अधिक झाला असल्याची माहिती व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष सीए मिलिंद काळे यांनी दिली.