मुंबई: मिरॅ ॲसेट इन्‍व्‍हेस्‍टमेंट मॅनेजर्स (इंडिया)ने सध्या तेजीत असलेल्या सोन्यातील गुंतवणुकीवर केंद्रीत गोल्‍ड ईटीएफच्‍या युनिट्समध्‍ये गुंतवणूक करणारी योजना ‘मिरॅ ॲसेट गोल्‍ड ईटीएफ फंड ऑफ फंड’ दाखल केला आहे.  १६ ऑक्‍टोबरपासून खुल्या झालेल्या या योजनेत, मंगळवार २२ ऑक्‍टोबर २०२४ पर्यंत गुंतवणूक करता येईल. त्यानंतर ही योजना निरंतर पुनर्खरेदी व विक्रीसाठी २८ ऑक्‍टोबर २०२४ पासून पुन्‍हा खुली होईल. रितेश पटेल आणि अक्षय उदेशी या योजनेचे निधी व्‍यवस्‍थापन पाहतील. एनएफओदरम्‍यान योजनेत किमान गुंतवणूक रक्‍कम ५,००० रूपये असेल आणि त्‍यानंतर १ रूपयाच्‍या पटीत गुंतवणूक करता येईल.

हेही वाचा >>> पायाभूत सुविधा क्षेत्रातील ॲफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चरही भांडवली बाजारात, शुक्रवारपासून प्रत्येकी ४४० ते ४६३ रुपये किमतीला ‘आयपीओ’

ट्रस्ट एमएफ स्मॉल कॅप फंड गुंतवणुकीस खुला

मुंबईः भारतातील सूचीबद्ध स्मॉल कॅप कंपन्यांतील गुंतवणुकीतून संपत्ती निर्मितीचे लक्ष्य ठेऊन ट्रस्ट म्युच्युअल फंडाने नवीन ‘ट्रस्ट एमएफ स्मॉल कॅप फंड’ योजना प्रस्तुत केली आहे. फंडाचा ‘एनएफओ’ ११ ऑक्टोबर ते २५  ऑक्टोबर २०२४ दरम्यान खुला राहील. निफ्टी स्मॉलकॅप २५० या निर्देशांकाचा मागोवा घेणारा हा गुंतवणुकीस कायम खुला असलेला फंड आहे. ट्रस्ट म्युच्युअल फंडाचा हा दुसरा समभागसंलग्न अर्थात इक्विटी फंड आहे. स्मॉल कॅप कंपन्यांच्या नफ्यात सध्या वेगाने वाढ होत असल्याने त्याचे प्रतिबिंब त्या कंपन्यांच्या समभागांच्या किंमतीत वाढ होण्यात झाले आहे. भांडवली वृद्धीसाठी स्मॉलकॅप गट सध्या आकर्षक संधी उपलब्ध करून देत आहे. आकाश मंघानी, हे या फंडाचे निधी व्यवस्थापक आहेत.