मुंबईः देशातील सर्वात वेगाने वाढ साधत असलेले म्युच्युअल फंड घराणे ‘मिरॅ ॲसेट’ने नुकताच व्यवस्थापनाखालील एकूण मालमत्तेत (एयूएम) २ लाख कोटी रुपयांचा टप्पा गाठल्याची शुक्रवारी घोषणा केली. दक्षिण कोरियाई मालमत्ता व्यवस्थापन समूहाकडून २००८ साली भारतातील अंग म्हणून सुरुवात करणाऱ्या या फंड घराण्याने मागील पाच वर्षांत मालमत्तेत तब्बल ५४ टक्के चक्रवाढ दराने वाढ साधली आहे.
अल्पावधीत देशातील अव्वल १० म्युच्युअल फंड घराण्यात स्थान मिळविणाऱ्या मिरॅ ॲसेटने गत १६ वर्षांत जागतिक वित्तीय अरिष्टासारख्या कसोटीचा क्षण ठरलेल्या अनेक आव्हानांना पार करत ही कामगिरी केली, असे मिरॅ ॲसेट इन्व्हेस्टमेंट मॅनेजर्स (इं.) प्रा. लि.चे उपाध्यक्ष आणि मुख्याधिकारी स्वरूप आनंद मोहंती यांनी नमूद केले. फंड घराण्याने विविध ६९ योजनांमध्ये एकंदर ६८ लाख गुंतवणूकदार खाती (फोलियो) कार्यान्वित केली आहेत. यातील १० समभागसंलग्न (इक्विटी ओरिएंटेड) योजनांची मालमत्ता १.४७ लाख कोटी रुपये म्हणजेच फंड घराण्याच्या एकूण मालमत्तेत सुमारे ७५ टक्के हिस्सेदारी आहे. तर ‘एसआयपी’द्वारे गुंतवणुकीचा ओघ दरमहा ८६५ कोटी रुपये (३० नोव्हेंबरअखेर) आहे.
हेही वाचा >>>देशातील रोजगारांत ९ टक्के वाढ अपेक्षित; आयटी, दूरसंचार, रिटेलमध्ये सर्वाधिक संधी
भारताच्या अर्थव्यवस्थेची वाढ ही मजबूत आधारस्तंभावर उभी असून, पुढील संपूर्ण दशक हे भारतीयांसाठी संपत्तीनिर्माणाची जगाच्या तुलनेत सर्वाधिक संधी देणारे दशक ठरेल, असा विश्वास फंड घराण्याचे मुख्य गुंतवणूक अधिकारी नीलेश सुराना यांनी व्यक्त केला. मिरॅ ॲसेट स्मॉल कॅप फंड ही नवीन योजना नववर्षात जानेवारीमध्ये गुंतवणुकीसाठी खुली करण्याचे नियोजन असल्याचे ते म्हणाले.