पीटीआय, नवी दिल्ली
देशातील रोजगारांमध्ये गेल्या १० वर्षांत ३६ टक्के वाढ झाली आहे. देशातील रोजगार २०१४-१५ मधील ४७.१५ कोटींवरून २०२३-२४ मध्ये ६४.३३ कोटींवर पोहोचले आहेत, अशी माहिती केंद्रीय कामगारमंत्री मनसुख मंडाविया यांनी गुरूवारी दिली.
केंद्रीय कामगारमंत्री मंडाविया म्हणाले की, संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) सरकारच्या २००४ ते २०१४ या कालावधीत देशातील रोजगारांमध्ये केवळ ७ टक्के वाढ झाली. संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या कार्यकाळात २.९ कोटी अतिरिक्त रोजगार निर्माण झाले. याचवेळी मोदी सरकारच्या २०१४ ते २०२४ या काळात १७.१९ कोटी रोजगार निर्माण झाले. फक्त गेल्या वर्षाचा (२०२३-२४) विचार केल्यास सरकारने ४.६ कोटी रोजगार निर्माण केले आहेत.
हेही वाचा : घाऊक किंमत निर्देशांकाचे आधार वर्ष बदलणार, रमेश चंद यांच्या अध्यक्षतेखाली केंद्राकडून समिती
संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या २००४ ते २०१४ या काळात कृषी क्षेत्रातील रोजगारात १६ टक्के घट झाली. उलट मोदी सरकारच्या २०१४ ते २०२३ या काळात कृषी क्षेत्रातील रोजगारांमध्ये १९ टक्के वाढ झाली. संयुक्त पुरोगामी आघाडीच्या कार्यकाळात निर्मिती क्षेत्रातील रोजगारांतील वाढ ६ टक्के होती. मोदी सरकारच्या २०१४ ते २०२३ या काळात निर्मिती क्षेत्रातील रोजगारांत १५ टक्के वाढ नोंदविण्यात आली. संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या कार्यकाळात सेवा क्षेत्रातील रोजगार २५ टक्क्यांनी वाढले तर मोदी सरकारच्या कार्यकाळात ३६ टक्क्यांनी वाढले, असे मंडाविया यांनी स्पष्ट केले.
देशातील बेरोजगारीचा दर २०१७-१८ मध्ये ६ टक्के होता. तो २०२३-२४ मध्ये कमी होऊन ३.२ टक्क्यांवर आला आहे. याचवेळी रोजगाराचा दर २०१७-१८ मध्ये ४६.८ टक्के होता आणि तो २०२३-२४ मध्ये ५८.२ टक्क्यांवर पोहोचला. – मनसुख मंडाविया, केंद्रीय कामगार मंत्री