टोमॅटोचे भाव २५० रुपये प्रतिकिलोवर पोहोचल्यानंतर सरकारने ते स्वस्त दरात उपलब्ध करून देण्यासाठी अनेक प्रयत्न केले, त्यातही यश आले आणि देशातील अनेक भागात टोमॅटोचे भाव ४० रुपये किलोपर्यंत खाली आलेत. त्याचवेळी कांद्याचे भाव सातत्याने वाढत असताना आणि महागाईने जनतेला अश्रू अनावर झाले आहेत. त्यामुळे कांदासुद्धा स्वस्त दरात उपलब्ध करून देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
प्रमुख बाजारपेठेत कांदा पाठवण्याव्यतिरिक्त बफरमधील कांदा किरकोळ ग्राहकांना देखील २५/- प्रति किलो अनुदानित दराने किरकोळ दुकाने आणि एनसीसीएफच्या फिरत्या वाहनाद्वारे सोमवार २१ ऑगस्ट २०२३ पासून उपलब्ध करून दिला जाणार आहे. इतर संस्था आणि ई-वाणिज्य मंचाचा समावेश करून आगामी काळात कांद्याची किरकोळ विक्री योग्यरीत्या वाढवली जाईल.
हेही वाचाः ‘गदर २’ स्टार सनी देओलच्या मुंबईतील बंगल्याचा होणार लिलाव, आता बँक वसूल करणार ‘इतके’ कोटी
कांद्याच्या ३.०० लाख मेट्रिक टन प्राथमिक खरेदीचे उद्दिष्ट गाठल्यानंतर अभूतपूर्व पाऊल उचलत सरकारने यावर्षी कांद्याच्या राखीव साठ्याचे ( बफर) प्रमाण ५.०० लाख मेट्रिक टन केले. या संदर्भात अतिरिक्त खरेदीचे लक्ष्य साध्य करण्यासाठी ग्राहक व्यवहार विभागाने एनसीसीएफ आणि नाफेडला प्रत्येकी १.०० लाख टन खरेदी करण्याचे निर्देश दिले असून, त्याचबरोबर प्रमुख खरेदी केंद्रांमध्ये खरेदी केलेल्या साठ्याचा निपटारा करण्यात येणार आहे. राखीव साठ्यासाठी कांदा खरेदी, लक्ष्यित बाजारपेठांसाठी कांदा पाठवणे आणि निर्यात शुल्क लागू करणे यांसारख्या सरकारने केलेल्या बहुआयामी उपाययोजनांमुळे कांदा उत्पादकांना किफायतशीर भाव मिळून ग्राहकांना परवडणाऱ्या किमतीत कांद्याची सतत उपलब्धता सुनिश्चित केल्यामुळे शेतकरी आणि ग्राहकांना फायदा होणार आहे.
हेही वाचाः करोडपती करदाते वाढले, ३ वर्षांत ‘इतक्या’ लोकांचे पगार झाले १ कोटींहून अधिक
ज्या राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील बाजारपेठांमध्ये कांद्याच्या किरकोळ किमती देश पातळीवरच्या सरासरीपेक्षा जास्त आहेत किंवा मागील महिन्याच्या तुलनेत लक्षणीयरीत्या जास्त आहेत, अशा बाजारपेठांवर लक्ष केंद्रित करून राखीव साठ्यामधून (बफर) कांद्याची विक्री करण्यास सुरुवात झाली आहे. आजपर्यंत राखीव साठ्यामधून सुमारे १४०० मेट्रिक टन कांदा लक्ष्यित बाजारपेठांमध्ये पाठवण्यात आला आहे आणि उपलब्धता वाढवण्यासाठी तो सातत्याने पाठवला जात आहे.