सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीच्या दोन तेल वितरण कंपन्यांनी हक्कभाग विक्रीच्या (राइट्स इश्यू) माध्यमातून निधी उभारणीची घोषणा केली आहे. गुरुवारी भांडवली बाजारात या परिणामी सर्वच तेल कंपन्यांच्या समभागांत मोठ्या उलाढालीसह मूल्यवाढ दिसून आली.
केंद्र सरकारकडून ‘महारत्न’ दर्जा प्राप्त असलेल्या भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड अर्थात बीपीसीएलने जून महिन्यात केलेल्या घोषणेप्रमाणे हक्कभाग विक्रीच्या माध्यमातून १८,००० कोटी रुपयांच्या निधी उभारणीचे उद्दिष्ट ठेवले आहे. पाठोपाठ इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने (आयओसी)देखील त्यांच्या शून्य कार्बन उत्सर्जन प्रकल्पांना निधी देण्यासाठी भांडवल उभारण्याची घोषणा केली आहे. आयओसीच्या शुक्रवारी होणाऱ्या बैठकीत कंपनीच्या संचालक मंडळाकडून निधी उभारणीचे उद्दिष्ट निर्धारित केले जाण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात (एप्रिल २०२३ ते मार्च २०२४) सार्वजनिक क्षेत्रातील बीपीसीएल, आयओसी आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (एचपीसीएल) शून्य कार्बन उत्सर्जनाचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी ३०,००० कोटी रुपयांची भांडवली मदत जाहीर केली होती.
गुरुवारच्या सत्रात मुंबई शेअर बाजारात बीपीसीएलचा समभाग १.७७ टक्क्यांनी वधारून ३९३.१० रुपयांवर बंद झाला, तर आयओसीचा समभाग ३.२२ टक्क्यांनी वधारून ९८.६० रुपयांवर स्थिरावला.
हेही वाचाः अदाणी समूहाला आणखी एक झटका; आधी शेअर्स घसरले, आता ‘या’ कंपनीचे मोठे नुकसान झाले