Bharat Brand: महागाईशी लढण्यासाठी मोदी सरकारने भारत ब्रँडला प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वप्रथम केंद्र सरकारने देशभरात भारत आटा आणि भारत डाळ सुरू केले. आता भारत राइस हा भारत ब्रँड अंतर्गत देशात येणार आहे. त्याची किंमत २५ रुपये प्रति किलो ठेवण्यात येणार आहे.
नाफेड, एनसीसीएफ आणि केंद्रीय भंडार येथून विक्री केली जाणार
इकॉनॉमिक टाइम्सच्या वृत्तानुसार, भारत सरकारच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने भारत राईस लॉन्च झाल्याची खातरजमा केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,’भारत तांदूळ’ ब्रँडची विक्री नाफेड (नॅशनल अॅग्रिकल्चरल कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया), एनसीसीएफ (नॅशनल कोऑपरेटिव्ह कंझ्युमर्स फेडरेशन) आणि केंद्रीय भंडार यांच्यामार्फत केली जाणार आहे.
हेही वाचाः Money Mantra : तुमचे आधार अपडेट वारंवार नाकारले जात आहे का? ही पद्धत वापरून पाहा
तांदळाच्या वाढत्या दराचा इशारा
यापूर्वी सरकारने तांदळाच्या वाढत्या किमतींबाबत व्यापाऱ्यांना इशारा दिला होता. बिगर बासमती तांदळाची किंमत ५० रुपये किलोवर पोहोचली आहे, तर सरकार सुमारे २७ रुपये प्रतिकिलो दराने व्यापाऱ्यांना उपलब्ध करून देत असल्याचे सरकारने म्हटले आहे. साठेबाजी करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा निर्णयही सरकारने घेतला होता.
भारत आटा २७.५० रुपये किलो
केंद्र सरकारने अलीकडेच २७.५० रुपये प्रति किलो दराने ‘भारत आटा’ लाँच केले होते. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी ६ नोव्हेंबर रोजी दिल्लीत हा ब्रँड लॉन्च केला. हा ‘भारत आटा’ १० आणि ३० किलोच्या पॅकमध्ये उपलब्ध आहे. नाफेड, एनसीसीएफ, सफर, मदर डेअरी आणि इतर सहकारी संस्थांमार्फतही त्याची विक्री केली जात आहे. भारत आटा अंदाजे २ हजार रिटेल आउटलेटवर उपलब्ध करून देण्यात आला आहे. यासाठी अडीच लाख मेट्रिक टन गहू सरकारी यंत्रणांना उपलब्ध करून देण्यात आला आहे.
सरकार कांदा आणि डाळीचीही विक्री करत आहे
बाजारात नॉन-ब्रँडेड पिठाची किंमत ३०-४० रुपये प्रति किलो आहे आणि ब्रँडेड पिठाची किंमत ५० रुपये किलो आहे. गव्हाच्या सततच्या वाढत्या किमतीमुळे पिठाच्या किमतीत झालेली वाढ पाहता सरकारने पीठ स्वस्त दरात विकण्याचा निर्णय घेतला होता. सध्या सरकार २५ रुपये किलो दराने कांदा विकत आहे. याशिवाय ‘भारत डाळ’ (हरभरा डाळ)ही ६० रुपये किलो दराने विकली जात आहे.