देशात अनेक नावाजलेल्या कंपन्या आहेत. इन्फोसिसपासून टीसीएसपर्यंत आणि विप्रोपासून एचसीएलपर्यंत, तसेच हिंदुस्तान युनिलिव्हर यांसारख्या कंपन्यांचा व्यवसाय देशभर आणि परदेशात पसरलेला आहे. या कंपन्या लाखो जणांना रोजगार देत आहेत. फोर्ब्सच्या मते, अब्जाधीश लोकसंख्येसह भारत जगात तिसर्या क्रमांकावर आहे, देशातील अब्जाधीशांची संख्या तब्बल १६० च्या जवळपास आहे. भारत हा स्टार्टअप्स आणि बहुराष्ट्रीय व्यवसायांसाठी एक चांगला पर्याय असल्याचं सिद्ध होत आहे. काही मोठ्या कंपन्यांसह भारतीय अब्जाधीश हळूहळू जगावर वरचष्मा गाजवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. विशेष म्हणजे त्या कंपन्यांना सर्वोच्च पातळीवर नेणारे कंपन्यांचे सीईओ आहेत. या कंपन्यांचे सीईओ कोण आहेत आणि त्यांचा पगार किती आहे? येथे सर्वाधिक पगार असलेल्या ५ सीईओंची माहिती आपण जाणून घेणार आहोत.
सलील पारेख, सीईओ आणि एमडी, इन्फोसिस
इन्फोसिस कंपनीचे सीईओ म्हणून सलील पारीख यांची २०१७ मध्ये नियुक्ती करण्यात आली होती. कंपनीच्या वार्षिक अहवालानुसार, त्यांना आर्थिक वर्ष २०२३ साठी त्यांच्या वार्षिक मानधनात २१ टक्क्यांची घट झाली. पारेख यांना आर्थिक वर्ष २०२३ मध्ये ५६.४४ कोटी पगार मिळाला, तर आर्थिक वर्ष २०२२ मध्ये ४३% ची लक्षणीय वाढ झाल्याने ७१.०१ कोटी रुपये पगार घेतला. पारेख यांना आर्थिक वर्ष २०२३ मध्ये ६.६७ कोटी रुपयांचे मूळ वेतन आणि १८.७३ कोटी रुपये बोनससह मिळाले. याव्यतिरिक्त त्यांना अतिरिक्त लाभ म्हणून ४५ लाख रुपये आणि पुरस्कार म्हणून ९.७१ कोटी रुपये मिळाले. मिंटनुसार, आर्थिक वर्ष २०२३ मध्ये इन्फोसिस कर्मचार्यांचे सरासरी वेतन ८,१४,३३२ रुपये झाले, जे २०२२ मध्ये ९,००,०१२ रुपये होते.
सी विजयकुमार, सीईओ आणि एमडी, एचसीएल टेक्नॉलॉजीज
सी विजयकुमार हे १९९४ मध्ये एचसीएल कंपनीत रुजू झाले आणि अल्प काळातच ते कंपनीचे महत्त्वाचे व्यक्ती झाले. एचसीएलच्या अहवालानुसार, त्यांचा वार्षिक पगार १३० कोटी रुपये असून, ते देशात सर्वाधिक पगार घेणाऱ्या सीईओंपैकी एक असल्याचं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. एका मोठ्या कंपनीचे नेतृत्व करण्याबरोबरच ते यूएस इंडिया बिझनेस कौन्सिलचे बोर्ड मेंबरदेखील आहेत. ते सध्या न्यू जर्सी येथे राहतात. २०२२ मध्ये सर्वाधिक पगार घेणारे CEO हे HCL कंपनीचे सी विजयकुमार आहेत. २०२१ मध्ये त्यांचा पगार १२३.१३ कोटी रुपये होता.
राजेश गोपीनाथन, माजी सीईओ आणि एमडी, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS)
२०१७ मध्ये राजेश गोपीनाथन यांची TCS चे CEO आणि MD म्हणून नियुक्ती करण्यात आली. कंपनीच्या वार्षिक अहवालानुसार, त्यांना आर्थिक वर्ष २०२३ मध्ये एकूण २९.१६ कोटी रुपये पगार मिळाला. आर्थिक वर्ष २०२२ च्या तुलनेत १३.१७% वाढ झाली. त्यांचे फायदे आणि भत्ते एकूण २.४३ कोटी, तर त्याचे वेतन १.७३ कोटी रुपये आहे. त्यांना २५ कोटी कमिशन मिळते. मिळालेल्या माहितीनुसार, गोपीनाथन यांनी गेल्या वर्षी पगाराच्या माध्यमातून २५.७५ कोटी कमावले, ज्यामुळे ते भारतीय आयटी उद्योगातील सर्वाधिक पगार घेणारे सीईओंमध्ये सामील झाले आहेत.
संजीव मेहता, सीईओ आणि एमडी, हिंदुस्तान युनिलिव्हर
हिंदुस्तान युनिलिव्हर ही अग्रगण्य ग्राहकोपयोगी वस्तूंचा पुरवठा करणारी कंपनी आहे, हिंदुस्तान युनिलिव्हरने ऑक्टोबर २०१३ मध्ये संजीव मेहता यांची मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती केली. HUL ही भारतातील सर्वात मोठी ‘फास्ट-मूव्हिंग कन्झ्युमर गुड्स’ कंपनी म्हणून उदयास आली आहे आणि तिचे CEO म्हणून मेहता यांना आर्थिक वर्ष २०२३ साठी २२.३६ कोटी रुपये वार्षिक वेतन मिळाले आहे. मागील वर्षी २२.०७ कोटी रुपयांच्या तुलनेत किरकोळ वाढ झाली आहे. संजीव मेहता सुमारे १० वर्षांपासून कंपनीशी संबंधित आहेत आणि HUL ची २०२३ वर्षाची वार्षिक उलाढाल ५८,१५४ कोटी रुपये आहे.
हेही वाचाः LPG Price Hike : एलपीजी सिलिंडरच्या दरात मोठी वाढ, आता सिलिंडर ‘इतक्या’ रुपयांना मिळणार
थियरी डेलापोर्ट, सीईओ, विप्रो
देशातील चौथ्या क्रमांकाची आयटी सेवा विप्रो कंपनी पुरवते, विप्रोच्या सीईओचा पगार सुमारे ८२ कोटी रुपये इतका आहे. आर्थिक वर्ष २०२३ मध्ये पगार गेल्या वर्षीच्या तुलनेत थोडा कमी होता. त्यांना १.६ दशलक्ष डॉलर (सुमारे १३ कोटी), ४.१७ दशलक्ष डॉलर (अंदाजे ३४ कोटी), १.३ दशलक्ष डॉलर (अंदाजे १२ कोटी), व्हेरिएबल पे आणि बॅलन्स २.९ दशलक्ष डॉलर (सुमारे २३ कोटी) रुपयांचे वेतन मिळाले. थियरी डेलापोर्टचे वार्षिक पॅकेज आर्थिक वर्ष २०२२मध्ये ७९.८ कोटी रुपये होते.
हेही वाचाः ‘पवन हंस’चे खासगीकरण पुन्हा फसले; यशस्वी बोलीदारच अपात्र ठरल्याने केंद्रावर नामुष्की