मुंबई: जागतिक पातळीवरील दोलायमान परिस्थितीमुळे देशांतर्गत भांडवली बाजारातील समभागांचे मूल्यांकन सध्या आकर्षक बनले आहे. या स्थितीत म्युच्युअल फंडातील शिस्तशीर गुंतवणुकीचा पर्याय असलेली ‘एसआयपी’ फायदेशीर ठरेल, असे युनियन म्युच्युअल फंडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मधू नायर म्हणाले.
केंद्र सरकारने प्राप्तिकर मर्यादेत वाढ केल्याने करदात्यांच्या हातात सुमारे १ लाख कोटींचा निधी उपलब्ध होणार आहे. त्यातील काही निधी निश्चितच बचत आणि गुंतवणुकीच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेला हातभार लावेल. तसे झाल्यास म्युच्युअल फंडातील मासिक एसआयपी ओघ सध्याचा २५,००० कोटींवरून येत्या १८ ते २४ महिन्यांमध्ये ४०,००० कोटींवर पोहोचण्याची अपेक्षा आहे. जागतिक भू-राजकीय तणाव आणि व्यापाराशी संबंधित अनिश्चितता यांसारखी अल्पकालीन आव्हाने कायम आहेत. तथापि भारताची दीर्घकालीन स्थूल आर्थिक मूलतत्त्वे मजबूत आहेत. कंपन्यांचे मजबूत ताळेबंद आणि बँकिंग क्षेत्राची चांगली कामगिरी, आणि कल्याणकारी योजनांमुळे मागणी पुनरुज्जीवित होण्याची शक्यता आहे. यामुळे खासगी क्षेत्राकडूनही नवीन गुंतवणुकीला सुरुवात होण्याची शक्यता आहे. हे भांडवली बाजाराला चालना देणारे प्रमुख सकारात्मक घटक असल्याचे ते म्हणाले.
बाजारातील सध्या अस्थिर वातावरणात गुंतवणूकदारांनी ‘एसआयपी’वर अधिक लक्ष केंद्रित करायला हवे. कारण प्रत्येक बाजार परिस्थितीमध्ये गुंतवणूक केल्याने घसरणीच्या टप्प्यात अधिक युनिट प्राप्त होतात आणि बाजारातील तेजीच्या परिस्थितीमध्ये मात्र त्या युनिटचे मूल्य (एनएव्ही) वाढते. त्यामुळे पुढे जायचे असेल तर ‘एसआयपी करा’ या मोहिमेअंतर्गत दीर्घावधीसाठी गुंतवणूक करण्याचे युनियन म्युच्युअल फंडाकडून आवाहन करण्यात येत आहे. शिवाय या फंड घराण्याकडून लहान गुंतवणूकदारांना गुंतवणुकीस प्रोत्साहन देण्यासाठी लवकरच १०० रुपयांपासून सुरू होणाऱ्या मासिक ‘एसआयपी’ही सुरू केली गेली आहे.