पीटीआय, नवी दिल्ली
भारताचा विकासदर विद्यमान २०२५ कॅलेंडर वर्षात ६.४ टक्के राहील, असा आंतरराष्ट्रीय पतमानांकन संस्था ‘मूडीज’ने गुरुवारी अंदाज वर्तवला. याआधी वर्तवलेल्या अंदाजात मूडीजने आता घट केली असून तो ६.६ टक्क्यांवरून ६.४ टक्क्यांपर्यंत कमी होईल, असे म्हटले आहे. अमेरिकेचे नवीन व्यापारधोरण आणि जागतिक मागणी कमी झाल्यामुळे विकासदर घटण्याची शक्यता आहे.
आशिया-प्रशांत क्षेत्राविषयी दृष्टिकोन व्यक्त करणाऱ्या ‘आगामी अनागोंदी’ या शीर्षकाच्या अहवालात, अमेरिकेच्या नवीन व्यापार धोरणांमुळे संभाव्य ताण, धोरणात्मक बदल यामुळे २०२५ मध्ये आशिया-प्रशांत क्षेत्रातील अर्थव्यवस्थेतील वाढ मंदावेल. नवीन कर धोरण आणि जागतिक मागणी कमी होत असल्याने निर्यातीवर परिणाम होण्याची शक्यता असून संपूर्ण जगाचा विकासदर मंदावेल, असे त्यात म्हटले आहे.
वर्ष २०२५ मध्ये चीनची जीडीपी वाढ २०२४ मधील ५ टक्क्यांवरून वर्ष २०२५ मध्ये ४.२ टक्क्यांवर आणि वर्ष २०२६ मध्ये ती ३.९ टक्के राहण्याचा अंदाज त्यांनी वर्तविला आहे. तर येत्या काही वर्षांत भारतातील वाढ २०२४ मध्ये ६.६ टक्क्यांवरून कमी होऊन ६ टक्क्यांच्या श्रेणीत जाईल. अहवालाच्या अंदाजानुसार, २०२५ आणि २०२६ या दोन्ही आर्थिक वर्षात भारताचा जीडीपी ६.४ टक्के दराने वाढण्याची अपेक्षा आहे.